

t20 series australia announce 17 member squad for 3 match vs pak
सिडनी : पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका तयारीची मोठी संधी मानली जात आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन निवड समितीने संघात युवा खेळाडूंना प्राधान्य दिले असून २९ जानेवारीपासून या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे.
या मालिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे २० वर्षीय वेगवान गोलंदाज महली बियर्डमॅन याचा संघात झालेला समावेश. बियर्डमॅनसोबतच जॅक एडवर्ड्सलाही संघात स्थान मिळाले असून, या दोघांनाही आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. बिग बॅश लीग (BBL) मध्ये पर्थ स्कॉर्चर्ससाठी बियर्डमॅनने, तर सिडनी सिक्सर्ससाठी एडवर्ड्सने केलेल्या चमकदार कामगिरीचे फळ त्यांना मिळाले आहे.
निवड समितीने या मालिकेसाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. बिग बॅश लीगमध्ये धावांचा पाऊस पाडणारा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.
या दिग्गजांशिवाय पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड, टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस हे खेळाडूदेखील या दौऱ्यावर नसतील. त्यांच्या अनुपस्थितीत सीन एबॉट, बेन ड्वार्शुईस, मिचेल ओवेन आणि मॅथ्यू रेनशॉ यांसारख्या खेळाडूंना आपली छाप पाडण्याची संधी असेल.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ही मालिका लाहोरच्या ऐतिहासिक गद्दाफी स्टेडियमवर खेळवली जाईल.
पहिला सामना: २९ जानेवारी
दुसरा सामना: ३१ जानेवारी
तिसरा सामना: १ फेब्रुवारी
या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकासाठी भारतात दाखल होईल, तर पाकिस्तानचा संघ श्रीलंकेकडे रवाना होईल.
मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, झेवियर बार्टलेट, महली बियर्डमॅन, कूपर कॉनोली, बेन ड्वार्शुईस, जैक एडवर्ड्स, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जॉश इंग्लिस, मॅथ्यू कुह्नमॅन, मिच ओवेन, जॉश फिलिपी, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ॲडम झाम्पा.