
पुढारी ऑनलाईन डेस्क : Australia vs Pakistan ODI Series : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान संघाने गमावला होता. मात्र दुसऱ्या आणि तिस-या सामन्यात विजय मिळवून पाकने पुनरागमन केले. त्यांनी 2002 नंतर तब्बल 22 वर्षांनंतर कांगारूंना त्यांच्याच घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.
मोहम्मद रिझवानची कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. या मालिकेपूर्वी बाबर आझमने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रिझवानला पाकिस्तानच्या व्हाईट बॉल संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिस-या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने 27 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 141 धावांचे लक्ष्य गाठले आणि ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. (Australia vs Pakistan ODI Series)
तत्पूर्वी, पाकिस्तान संघाचा कर्णधार रिझवानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला. यजमान ऑस्ट्रेलियाचा डाव 31.5 षटकांत अवघ्या 140 धावांत गारद झाला. पाकिस्तान संघाकडून केवळ चार गोलंदाजांनी गोलंदाजी केली.
शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी 3 तर हरिस रौफने 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून सीन ॲबॉटने 30 आणि मॅथ्यू शॉर्टने 22 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. यानंतर पाकिस्तानने 2 गडी गमावून 141 धावांचे लक्ष्य गाठले. सैम अयुब आणि अब्दुल्ला शफीक या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. अयुबने 42 तर अब्दुल्ला शफीकने 37 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार रिझवान (30 धावा) आणि बाबर आझम (28) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाकडून लान्स मॉरिसने 2 बळी घेतले.
पाकला 22 वर्षांनंतर (8,187 दिवस) ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे मालिका जिंकण्यात यश आले आहे. यापूर्वी 2002 मध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. तेव्हा वकार युनूसच्या नेतृत्वाखाली पाकने मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग होता. पाकिस्तानचे सध्याचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी हेही त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून खेळले होते.
2024 मध्ये पाकिस्तान 2 - 1 ने विजयी
2017 मध्ये ऑस्ट्रेलिया 4 - 1 ने विजयी
2010 मध्ये ऑस्ट्रेलिया 5 - 0 ने विजयी
2002 मध्ये पाकिस्तान 3 - 2 ने विजयी