

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs PAK ODI Series : ॲडलेड ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुस-या वनडेमध्ये पाकिस्तानने यजमान ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रिझवानचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाला 35 षटकांत 163 धावांवर गारद केले. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 35 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय कांगारूंचा अन्य कोणताही फलंदाज 20 धावांच्या पुढे मजल मारू शकला नाही. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट जेक फ्रेझर मॅकगर्कच्या (13) रूपाने पडली. त्याला शाहीन शाह आफ्रिदीने एलबीडब्ल्यू आऊट केले. मॅथ्यू शॉट (19) सातव्या षटकात आफ्रिदीचा बळी ठरला. त्यानंतर जोश इंग्लिस (18), मार्नस लॅबुशेन (6), ॲरॉन हार्डी (14), ग्लेन मॅक्सवेल (16), कर्णधार पॅट कमिन्स (13) आणि ॲडम झाम्पा (18) धावा करून बाद झाले. हारिस रौफने 8 षटकांत 29 धावा देत पाच, तर शाहीन शाह आफ्रिदीने आठ षटकांत 26 धावा देत तीन बळी मिळवले. नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने 26.3 षटकांत केवळ एक विकेट 164 धावांचे विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि सैम अयुब यांनी पाकिस्तानची चांगली सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानची एकमेव विकेट अयुबच्या रूपाने पडली. जोश हेझलवूडच्या हाती तो फिरकीपटू ॲडम जम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अयुबने 71 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.
अयुब बाद झाल्यानंतर शफीक आणि माजी कर्णधार बाबर अझान यांनी संघाला विजय मिळवून दिला. शफिकने 69 चेंडूंत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या. तर बाबर 20 चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला होता. अशा स्थितीत पर्थ येथे होणारा शेवटचा वनडे सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.