

ashes series australia beats england in day night test match by 8 wickets
ब्रिस्बेन : ॲशेस मालिकेतील रोमांचक डे-नाईट कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली असून यजमान कांगरूंनी इंग्लंडला ८ गडी राखून मात दिली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. अवघ्या ६५ धावांचे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाने १० षटकांतच सामना खिशात घातला आणि गॅबाच्या मैदानावर इंग्लिश संघाला १४ व्यांदा धूळ चारली.
४३ धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा खेळ तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ९०/१ वरून १२८/६ असा कोसळला होता. मात्र, चौथ्या दिवशी बेन स्टोक्स आणि विल जॅक्स यांनी कमालीचा संयम दाखवत सामन्यात चुरस निर्माण केली. ऑस्ट्रेलियाच्या धारदार गोलंदाजीसमोर दोघांनीही २२० चेंडूंमध्ये ९६ धावांची झुंजार भागीदारी रचली. या भागीदारीमुळेच इंग्लंडने मालिकेत पहिल्यांदाच पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावण्याचा पराक्रम केला.
बार्मी आर्मीच्या जल्लोषात इंग्लंडने पिछाडी भरून काढत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली, पण पहिल्या सत्रानंतर नेसरने पुन्हा एकदा ब्रेकथ्रू दिला. नेसरच्या चेंडूवर जॅक्स (४१) याचा अप्रतिम झेल स्टीव्ह स्मिथने एका हाताने टिपला आणि इंग्लंडचा डाव पुन्हा गडगडला. त्यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या स्टोक्सलाही नेसरनेच माघारी पाठवले. या धक्क्यांमुळे इंग्लंडची अवस्था ८ बाद २२७ धावा अशी झाली. उरलेल्या दोन विकेट्स लवकर गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ ६५ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. मायकल नेसरच्या कारकिर्दीतील पहिल्या ५ बळींच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव २४१ धावांवर संपुष्टात आला.
६५ धावांच्या चिमुकल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड याने आक्रमक सुरुवात केली. त्याने नियमित अंतराने चौकार आणि एक षटकार लगावला. त्याला जॅक वेदरल्डची चांगली साथ मिळाली. या सलामीच्या जोडीने ३७ धावा फटकावल्या. मात्र, गस ॲटकिन्सनने एकाच षटकात हेडला आणि मार्नस लाबुशेन यांना तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले.
त्यानंतर मात्र, कर्णधार स्टीव्ह स्मिथने सूत्रे हाती घेतली. त्याने जोफ्रा आर्चरच्या नवव्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. दहाव्या षटकात वेदरल्डने चौकार मारल्यानंतर स्मिथने शॉर्ट बॉलवर षटकार खेचत सामन्याचा दिमाखदार शेवट केला आणि ऑस्ट्रेलियाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केला.
या सामन्यात एक विक्रमही नोंदवला गेला, ज्यात ३०० हून अधिक धावा करून डे-नाईट कसोटी गमावणारा इंग्लंड पहिला संघ ठरला. इंग्लंडच्या पहिल्या डावात जो रूटने १३८ धावांची शानदार नाबाद शतकी खेळी केली. हे त्याचे ऑस्ट्रेलियातील पहिले कसोटी शतक ठरले आणि त्याच्याच जोरावर इंग्लंडने २ बाद ५ अशा बिकट अवस्थेतून ३३४ धावांपर्यंत मजल मारली होती.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने पहिल्या डावात ७५ धावांत ६ बळी अशी भेदक गोलंदाजी केली. फलंदाजीतही त्याने ७७ धावांचे योगदान दिले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५११ धावांचा डोंगर उभा केला.
ऑस्ट्रेलियाने सर्वच विभागात सरस कामगिरी करत ॲशेसमध्ये इंग्लंडवर वर्चस्व सिद्ध केले आहे. मालिकेतील ही २-० ची आघाडी यजमानांचे मनोबल वाढवणारी आणि इंग्लंडची चिंता वाढवणारी नक्कीच आहे.