Asian Games : भारत-जपान भिडणार! जेतेपद कायम राखण्‍याच्‍या मोहिमेचा श्रीगणेशा

हरमनप्रीतच्‍या नेतृत्‍वाखाली भारत महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरणार, स्‍पर्धेत आठच संघ सहभागी असल्‍याने थेट उपांत्यपूर्व लढतीपासून सुरुवात
Asian Games : भारत-जपान भिडणार! जेतेपद कायम राखण्‍याच्‍या मोहिमेचा श्रीगणेशा
Published on
Updated on

नागोया-जपान : आशिया चषक विजयाची लय आणि विजयी घोडदौड कायम राखत, गतविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ आज (शुक्रवार) आशियाई क्रीडा स्पर्धांमधील आपल्या विजेतेपद कायम राखण्‍याच्‍या मोहिमेला जोरदार सुरुवात करणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताचा सामना यजमान जपानविरुद्ध होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०.३० वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.

दुबईत नुकताच विक्रमी आठवा आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय संघ या मोठ्या स्पर्धेत आत्मविश्वासाने उतरत आहे. मात्र, बाद फेरीचे (नॉक-आऊट) स्वरूप असल्याने संघाला प्रत्‍येक सामन्‍यात दक्ष राहावे लागणार आहे. या महिला स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून, लढती थेट उपांत्यपूर्व फेरीपासून सुरू होत आहेत. म्हणजेच, संघांना स्पर्धेत स्थिरावण्यासाठी कोणतीही साखळी फेरी उपलब्ध नाही. येथे एकच पराभव मोहिमेला पूर्णविराम देऊ शकतो.

आशिया चषकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत संघाची आघाडीची फलंदाज आणि सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरलेली शेफाली वर्मा भारताचे मुख्य अस्त्र ठरणार आहे. दुसरीकडे, उपकर्णधार स्मृती मानधनाची कामगिरी काहीशी संमिश्र

राहिली होती. भारताची गोलंदाजी प्रामुख्याने अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि डाव्या हाताची फिरकीपटू श्री चरणी हिच्याभोवती केंद्रित असेल. श्री चरणीने अवघ्या ३० सामन्यांत ५० टी-२० आंतरराष्ट्रीय बळींचा टप्पा गाठला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिची कामगिरीही मागील मालिकेत संमिश्र राहिली होती.

दुसरीकडे, घरच्या मैदानावर खेळणारा जपान संघ बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. यजमान संघासमोर भारताच्या भेदक गोलंदाजीचा सामना करण्याचे मोठे आव्हान असेल. भारताच्या फिरकी गोलंदाजीचा यशस्वी मुकाबला करत त्यांच्या आक्रमक सलामीवीरांना रोखणे जपानसाठी आवश्यक ठरेल.

बांगला देश, पाकिस्‍तान महिला संघ उपांत्‍य फेरीत

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या क्रिकेट प्रकारात बांगला देशने एकाही सामन्यात न उतरता उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तानने एका अटीतटीच्या सामन्यात नामुष्कीजनक कामगिरी करणाऱ्या थायलंडचा जेमतेम पराभव करत अंतिम चारमधील आपले स्थान निश्चित केले. मैदान ओलसर असल्‍यामुळे चीनविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना रद्द करण्यात आल्यानंतर, बांगला देशने आपल्या सरस आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऐची प्रांतातील निशिन शहरातील कारोजी स्पोर्टस्‌ पार्क येथे होणारा हा टी-२० सामना नाणेफेकीशिवायच रद्द घोषित करण्यात आला. बांगला देश सध्या ‘आयसीसी’च्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत १० व्या स्थानावर आहे, तर चीन ३६ व्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news