

Asian Games 2026 Vithya Ramraj breaks P T Usha's record
भारतीय ॲथलेटिक्स विश्वात सोमवारी (दि. २८) एका नव्या सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. भारताची अव्वल धावपटू विथ्या रामराज हिने महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या नेत्रदीपक यशासह तिने दिग्गज धावपटू पी. टी. उषा यांचा तब्बल ४२ वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. कोईम्बतूरच्या २८ वर्षीय विथ्याने ५४.७५ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून हा पराक्रम रचला. पी. टी. उषा यांनी १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवून हा विक्रम प्रस्थापित केला होता.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही अत्यंत वेगवान शर्यत ठरली. यामध्ये युएईच्या (UAE) मरियम करीमने ५४.३१ सेकंदांच्या विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर कझाकस्तानच्या ॲडेलिना झेम्सने ५४.५८ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. या शर्यतीत अंतिम फेरीत पोहोचलेल्या आठपैकी चार धावपटूंनी आपली वैयक्तिक सर्वोत्तम वेळ गाठली. शर्यत संपल्यानंतर भारतीय ॲथलेटिक्समधील सर्वात जुना विक्रम मोडल्याचे लक्षात येताच विथ्याने मैदानातच ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. या स्पर्धेत भारताची दुसरी धावपटू अनु राघवन हिनेदेखील ५५.८८ सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवत पाचवे स्थान मिळवले.
या ऐतिहासिक यशानंतर विथ्या म्हणाली, "पदक जिंकणे हाती असते, पण वेळ हातात नसते. हा क्षण पुन्हा येणार नव्हता, त्यामुळे माझे पूर्ण लक्ष पदकापेक्षा टायमिंगवर होते. प्रशिक्षक नेहपाल सिंग राठोड यांनी मला ५४ सेकंदांचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य दिले होते. त्यांनी सांगितल्यानुसार सहाव्या हर्डल्सपर्यंत वेग नियंत्रित ठेवून त्यानंतर अंतिम रेषेपर्यंत पूर्ण ताकदीने धावले आणि अखेर ते साध्य झाले." विशेष म्हणजे, सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्ष असलेल्या पी. टी. उषा स्वतः या स्पर्धेसाठी मैदानात उपस्थित होत्या.
विथ्याचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे सलग दुसरे वैयक्तिक कांस्यपदक ठरले आहे; मागील स्पर्धेतही तिने कांस्यपदक मिळवले होते. तसेच २०१८ च्या जकार्ता स्पर्धेत अनु राघवनने मिळवलेल्या कांस्यपदकानंतर या क्रीडा प्रकारात भारताचे हे सलग तिसरे पदक आहे. चालू स्पर्धेत विथ्याचे हे दुसरे पदक असून, यापूर्वी तिने ४x४०० मीटर मिश्र रिले संघात रौप्यपदक पटकावले होते. आता ती महिलांच्या ४x४०० मीटर रिलेमध्येही सहभागी होणार आहे. या पदकासह भारताने ॲथलेटिक्समध्ये ६ रौप्य आणि ८ कांस्य अशा एकूण १४ पदकांची कमाई केली आहे.
दुसरीकडे, भारताचा प्रमुख लांब पल्ल्याचा धावपटू महाराष्ट्राच्या अविनाश साबळेला आपल्या सुवर्णपदकाचा बचाव करता आला नाही. दुखापतींशी लढा देणाऱ्या ३२ वर्षीय अविनाशने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात ८ मिनिटे २१.६७ सेकंद अशी यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम वेळ नोंदवली खरी, पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जपानच्या रियुजी म्युराने ८:१७.३६ च्या विक्रमी वेळेसह सुवर्ण, जपानच्याच र्योमा आओकीने रौप्य (८:१७.६०) तर कतारच्या झकारिया इलाहलामीने कांस्यपदक (८:१८.१३) जिंकले.
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत भारताचा संतोष कुमार तमिळरासन ४९.९५ सेकंदांच्या वेळेसह सातव्या स्थानी फेकला गेला. याशिवाय, महिलांच्या थाळीफेक (डिस्कस थ्रो) प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सीमा कलीरामना हिने ५९.८८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करूनही तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले; कारण तिन्ही पदक विजेत्या खेळाडूंनी ६० मीटरहून अधिक लांब फेक नोंदवली होती.