पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Champions Trophy Hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारताने बुधवारी मलेशियाचा 8-1 ने चिरडले. या विजयासह भारताने विजयाची हॅट्ट्रीक केली असून संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. टीम इंडियाच्या राज कुमार पालने तिसऱ्या, 25व्या आणि 33व्या मिनिटाला तीन गोल केले तर अरजित सिंग हुंदलने सहाव्या आणि 39व्या मिनिटाला दोन गोल केले. जुगराज सिंगने सातव्या मिनिटाला, हरमनप्रीत सिंगने 22व्या मिनिटाला आणि उत्तम सिंगने 40व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल करून भारतीय संघाचा विजय साकारला. मलेशियासाठी अकिमुल्लाह अनुवरने एकमेव गोल केला.
भारताने खेळाची सुरुवात आक्रमक केली. ज्यामुळे मलेशियन संघ बॅकफूटवर गेला. सामन्याच्या पहिल्या सात मिनिटांतच भारताने तीन गोल केले. राजकुमार पालने पहिला गोल केला. त्याने उत्कृष्ट स्टिकवर्क दाखवले. दुसरा गोल अरायजित सिंग हुंदलने (6व्या मिनिटाला) केला. त्याने मलेशियाच्या गोलरक्षकाच्या डाव्या खांद्यावर चेंडू मारला, तर तिसरा गोल जुगराज सिंगच्या दमदार ड्रॅग-फ्लिकद्वारे झाला.
पॅरिस ऑलिम्पिक हॉकी कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने मलेशियाविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला राजकुमार पालने मैदानी गोल करत संघाचे खाते उघडले. भारतीय संघाने ही लय कायम ठेवली आणि 10व्या मिनिटालाच आघाडी दुप्पट केली. अरजित हुंदलने दुसरा गोल केला. खेळाच्या 11व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे जुगराज सिंगने गोलमध्ये रूपांतर केली. अशाप्रकारे पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने 3-0 अशी नेत्रदीपक आघाडी मिळवली. यादरम्यान, भारताच्या सुखजित सिंगला पंचांनी ग्रीन कार्ड दाखवले, त्यामुळे त्याला दोन मिनिटे मैदान सोडावे लागले.
सामन्याचा दुसरा क्वार्टरही भारतीय हॉकी संघाच्या नावावर राहिला. या क्वार्टरमध्ये आणखी दोन गोल नोंदवून भारतीय संघाने मलेशियावर 5-0 ची आघाडी घेतली. मलेशिया संघाचे खेळाडू चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी सतत धडपडताना दिसत होते. या क्वार्टरमध्ये राजकुमार पालने सामन्यातील आपला दुसरा गोल केला तर कर्णधार हरमनप्रीत सिंगनेही आपले खाते उघडले.
सामन्याच्या उत्तरार्धातही भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम राहिले. राजकुमार पालने गोलची हॅट्ट्रिक पूर्ण केली तर अरजित सिंगनेही सामन्यातील दुसरा गोल केला. मात्र, खेळाच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये मलेशियानेही आपले खाते उघडले. मलेशिया संघासाठी अखिमुल्ला अनुवरने गोल केला. खेळाच्या तिसऱ्या क्वार्टरअखेर भारत 8-1 अशा आघाडीसह सामन्यात मजबूत स्थितीत होता. खेळाचा चौथा क्वार्टर गोलरहित राहिला. भारतीय संघ 9 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून संघ आता गुरुवारी चौथा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध खेळणार आहे.