AUS vs ENG : ‘बॉक्सिंग कसोटी’त ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजांवर भिस्त; फिरकीपटूशिवाय मैदानात उतरणार

Ashes Series Boxing Day Test : या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला 12 जणांचा संघ जाहीर केला आहे.
AUS vs ENG Boxing Day Test
Published on
Updated on

मेलबर्न : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ॲशेस कसोटी सामन्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियाने आपल्या रणनीतीत मोठा बदल केला असून, जखमी नॅथन लियॉनच्या जागी कोणत्याही फिरकीपटूचा समावेश न करता केवळ वेगवान गोलंदाजांच्या बळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला 12 जणांचा संघ जाहीर केला आहे. शुक्रवारपासून (दि २६) पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरुवात होईल.

ॲडलेड येथील कसोटीत विजय मिळवून मालिका खिशात टाकल्यानंतर, अनुभवी फिरकीपटू नॅथन लियॉनला धोंडशिरेच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे. त्याच्या जागी ऑफस्पिनर टॉड मर्फीला संघात पाचारण करण्यात आले होते. मात्र, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील (एमसीजी) खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत असल्याने ऑस्ट्रेलियाने मर्फीला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. शेन वॉर्न आणि नॅथन लियॉन यांच्यासारख्या फिरकीपटूंनी ऐतिहासिक यश मिळवलेल्या या मैदानावर फिरकीपटूशिवाय खेळण्याचा ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय दुर्मीळ मानला जात आहे.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच 3-0 अशी आघाडी घेत शेस चषक आपल्याकडे राखला आहे. चौथ्या सामन्यासाठी झाय रिचर्डसन, ब्रेंडन डॉगेट आणि मायकेल नेसर या वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. फलंदाजीमध्ये अनुभवी उस्मान ख्वाजाला पसंती देण्यात आली असून, यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिसला संघात स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, इंग्लंडच्या संघातून स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर गेला असून इंग्लंडसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे :

ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, जॅक वेदरल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, ब्रेंडन डॉगेट, स्कॉट बोलँड.

इंग्लंड संघ : झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.

  • भारतीय प्रमाणवेळ : पहाटे 5 पासून

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्‌‍ नेटवर्क

सध्या खेळवल्या जाणाऱ्या खेळपट्ट्या फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजीला अधिक पूरक आहेत. ॲडलेडमधील परिस्थिती वेगळी होती, मात्र मेलबर्नची खेळपट्टी पाहता येथे वेगवान गोलंदाजांना मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news