

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आरसीबीला सलग दुसरे आयपीएल जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणार्या विराट कोहली, रजत पाटीदार आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे, पण या यशाच्या मागे पडद्याआड राहून शांतपणे रणनीती आखणारा एक अवलिया मात्र या विजयाचा शिल्पकार ठरला, तो म्हणजे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर!
ऑगस्ट 2023 मध्ये फ्लॉवर यांनी आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. तोपर्यंत संघ पहिल्या आयपीएल ट्रॉफीसाठी झगडत होता आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत होता. आरसीबीनेही कोहलीसोबत एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, डेल स्टेन, शेन वॉटसन आणि युवराज सिंगसारखे दिग्गज संघात असूनही वर्षानुवर्षे अपयशच पाहिले होते.
अखेर आरसीबीला झिम्बाब्वेच्या फ्लॉवर यांच्या रूपाने तारणहार मिळाला. माईक हेसन यांच्यानंतर सूत्रे हाती घेताच फ्लॉवर यांनी आरसीबीच्या गोलंदाजीची बाजू भक्कम करण्यावर भर दिला. या संघाने 2025 मध्ये भुवनेश्वर कुमारला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते; परंतु हा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला; भुवनेश्वरने दोन हंगामांत तब्बल 45 बळी घेत या संधीचे खर्या अर्थाने सोने केले.