

मुंबई : IPL 2026 च्या हंगामात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक खेळीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. वैभवच्या तुफानी फॉर्ममुळे सध्या राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या कारकिर्दीबाबत क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू अंबाती रायडूने यशस्वी जैस्वालला चक्क आपली टीम बदलण्याचा सल्ला देऊन एक नवा वाद निर्माण केला आहे.
राजस्थान रॉयल्ससाठी सलामीला फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने ज्या पद्धतीने धावांचा पाऊस पाडला आहे, त्यानंतर यशस्वी जैस्वालच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. चालू हंगामात यशस्वीने १५ सामन्यांत ४२६ धावा केल्या असल्या तरी, वैभवच्या आक्रमकतेसमोर या धावा फिक्या वाटत आहेत. यापूर्वी रवीचंद्रन अश्विननेही यशस्वीच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचे भाष्य केले होते. आता रायडूच्या वक्तव्यामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.
'क्रिकइन्फो'शी संवाद साधताना रायडूने म्हटले की, ‘यशस्वीने आता आपली टीम बदलणेच योग्य ठरेल. वैभव सूर्यवंशी ज्या लयीत फलंदाजी करत आहे, ते पाहता यशस्वीला वारंवार त्याच्या सावलीत राहावे लागेल आणि यामुळे यशस्वीचे स्वतःचे महत्त्व कमी होत आहे. तो एक स्टार खेळाडू आहे आणि जेव्हा तो दुसऱ्या टीममध्ये जाईल, तेव्हा तो स्वतःच्या जोरावर सामने जिंकू शकेल. त्याला अशी जागा आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे जिथे तो मुक्तपणे खेळू शकेल.’
रायडूने पुढे वैभवचा उल्लेख करत असेही सुचवले की, ‘हा खेळाडू नेहमीच असाच आक्रमक खेळत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यासोबत एखादा अनुभवी जोडीदार असणे गरजेचे आहे, जो वैभवच्या यशाचे कौतुक करेल, ना की त्याच्याशी स्पर्धा करेल. यशस्वीसाठी मुंबई इंडियन्स (MI) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.’
वैभव सूर्यवंशी : १५ सामने : ६८० धावा : ४५.३३ सरासरी : २४२.८६ स्ट्राईक रेट : ५५ चौकार : ६५ षटकार
यशस्वी जैस्वाल : १५ सामने : ४२६ धावा : ३२.७६ सरासरी : १५३.२३ स्ट्राईक रेट : ५२ चौकार : १८ षटकार
आकडेवारीवरून स्पष्ट होते की, वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. जरी यशस्वीची कामगिरी अन्य खेळाडूंच्या तुलनेत समाधानकारक असली, तरी वैभवच्या उत्तुंग खेळीसमोर ती सध्या दुय्यम ठरत असल्याचे चित्र आहे. आता यशस्वी या सल्ल्याचा कसा विचार करतो आणि भविष्यात काय निर्णय घेतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.