

Aman Rao Century: भारतीय क्रिकेटमध्ये युवा फलंदाजांची नवी पिढी सातत्याने चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी याने 11 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला होता. मात्र आता त्याच फ्रँचायझीच्या आणखी एका खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ घालत नवा इतिहास रचला आहे.
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अमन राव पेरालाने तेलंगणा टी-20 लीगमध्ये अवघ्या 32 चेंडूत शतक झळकावत भारतीय टी-20 लीगमधील सर्वात वेगवान शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूचा मान पटकावला आहे. यासह त्याने वैभव सूर्यवंशीचा 35 चेंडूत केलेल्या शतकाचा विक्रम मोडला आहे.
22 वर्षीय अमन राव पेराला हा हैदराबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तेलंगणा टी-20 लीगमध्ये तो वारंगल वॉरियर्स संघाचे नेतृत्व करत आहे. सोमवारी (22 जून 2026) मेडक फाल्कन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अविश्वसनीय फलंदाजी करत अवघ्या 48 चेंडूत 142 धावांची धडाकेबाज खेळी केली.
या खेळीत त्याने तब्बल 13 षटकार आणि 12 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 295.83 इतका होता. जोरदार फटकेबाजी करत त्याने गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
भारतीय टी-20 लीगमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत आता अमन राव अव्वल स्थानी पोहोचला आहे.
अमन राव पेराला – 32 चेंडूत शतक (तेलंगणा टी-20 लीग)
वैभव सूर्यवंशी – 35 चेंडूत शतक (IPL 2025)
वैभव सूर्यवंशी – 36 चेंडूत शतक (IPL 2026)
युसूफ पठाण – 37 चेंडूत शतक
प्रियांश आर्या – 39 चेंडूत शतक
मात्र भारतीय टी-20 स्पर्धांमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम अजूनही क्रिस गेलच्या नावावर कायम आहे. त्याने 2013 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना केवळ 30 चेंडूत शतक झळकावले होते.
अमन राव पेराला हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात राजस्थानने त्याला 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत संघात घेतले होते. मात्र संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
आता या विक्रमी खेळीनंतर राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत सलग पोस्ट शेअर केल्या. फ्रँचायझीने "टीममध्ये आणखी एका विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री" अशा शब्दांत त्याचे स्वागत केले आहे.
अमनची ही विस्फोटक खेळी पाहता आगामी आयपीएल हंगामात तो राजस्थान रॉयल्ससाठी मोठा मॅचविनर ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.