

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lakshya Sen : स्टार भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या ऑल इंग्लंड 2025 मधील शानदार प्रवासाला उपांत्यपूर्व फेरीत पूर्णविराम मिळाला. शुक्रवारी, 14 मार्च रोजी झालेल्या सामन्यात त्याला चीनच्या ली शिफेंगकडून पराभव स्विकारावा लागला. गेल्या फेरीत गतविजेता जोनाथन ख्रिस्तीला पराभूत करणाऱ्या लक्ष्य सेनला चिनी शटलरने 21-10, 21-16 अशा सरळ गेममध्ये नमवले. या पराभवासह स्पर्धेत भारताच्या एकेरीतील आव्हानाची समाप्ती झाली.
चिनी बॅडमिंटनपटू ली शिफेंगने पहिला गेम झटपट संपवला. त्याने हा गेम 21-10 असा जिंकला. या गेमदरम्यान त्याने सलग नऊ गुण घेत लक्ष सेनला सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. मात्र, लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये जोरदार लढत दिली आणि ब्रेकपर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. मात्र, ब्रेकनंतर तो ही आघाडी टिकवू शकला नाही. शिफेंगने सामना आपल्या बाजूने वळवला आणि 21-16 असा दुसरा गेम जिंकत अवघ्या 45 मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब केला. त्या आधी राउंड ऑफ 16 मध्ये लक्ष्यने गतविजेत्या जोनाथन ख्रिस्तीचा प्रभावी खेळ करत 21-13, 21-10 अशा सहज विजयासह स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता.
या सामन्यापूर्वी सेनचा शिफेंगविरुद्ध चांगले रेकॉर्ड राहिले आहे. गेल्या दोन लढतींमध्ये, त्याने चिनी खेळाडूला मात दिली होती, त्यापैकी एक विजय थॉमस कपमध्ये नोंदवला होता. मात्र, यावेळी लक्ष्य सेनला त्याचा फॉर्म टिकवता आला नाही.