
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी क्रमवारीत त्याचा आता धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या पराभवानेही देखील भारताची मानांकनात घसरण झाली आहे. टीम इंडियाची आता 109 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसर्या स्थानावर घसरण झाली आहे.
भारतासाठी मागील कसोटी हंगाम फारसा यशस्वी ठरला नाही. इंग्लंडविरुद्ध 4-1 अशा मोठ्या विजयाने कसोटी मालिकेची सुरुवात करत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 अशा पराभवाने याची सांगता करावी लागली आहे. यासह भारताला आता कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाला नुकतेच ऑस्ट्रेलिया दौर्यात दारुण मालिका पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे पाकिस्तानचा संघही दक्षिण आफ्रिका दौर्यावर आहे. त्यात आफ्रिकेने पाकिस्तानवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला आहे. त्याचेही पडसाद मानांकनात उमटले आहेत.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यासह पाकिस्तानचा संघही दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर होता, या दोन्ही मालिकांच्या निकालाचा भारताच्या कसोटी क्रमवारीवर परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया क्रमवारीत खाली घसरली आहे; तर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघ दीर्घकाळापासून आयसीसी कसोटी क्रमवारीत वर्चस्व गाजवत आहे. मात्र सततच्या पराभवांमुळे टीम इंडियाची क्रमवारी घसरली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया दुसर्या स्थानावर होती. मालिका संपल्यानंतरही टीम इंडिया दुसर्या स्थानावरच कायम होती. पण दक्षिण आफ्रिकेने आता भारतीय संघाला धक्का दिला असून आफ्रिकेचा संघ पाकिस्तानविरुद्ध 2-0 अशा निर्भेळ मालिका विजयासह दुसर्या स्थानी पोहोचला आहे. आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करताच त्यांचे रेटिंग पॉईंट भारतापेक्षा चांगले झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 112 रेटिंग गुणांसह दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन संघ 126 गुणांसह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर टीम इंडियाला केवळ क्रमवारीतच फटका बसला नाही. तर भारतीय संघही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा अंतिम सामना 11 जूनपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. भारत 2021 आणि 2023 मध्ये अंतिम फेरी खेळला होता. मात्र, त्यावेळी प्रथम न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला होता.