

नवी दिल्ली : आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी (३१ डिसेंबर) आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. स्टार फिरकीपटू राशिद खानच्या नेतृत्वाखालील या संघात चार प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाले असून, यामुळे अफगाणिस्तानची बाजू अधिक भक्कम झाली आहे.
निवड समितीने वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी, ऑफस्पिनर मुजीब उर रहमान, अष्टपैलू गुलबदीन नायब आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या बांगला देश दौऱ्यासाठी फारुकी आणि नायब यांना संघात स्थान मिळाले नव्हते, मात्र विश्वचषकाचे महत्त्व लक्षात घेता त्यांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
खांद्याच्या दुखापतीमुळे सप्टेंबरमधील आशिया चषकाला मुकलेला नवीन-उल-हक प्रदीर्घ काळानंतर मैदानात परतणार आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना डिसेंबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता.
मुजीब उर रहमानच्या पुनरागमनामुळे युवा मिस्ट्री स्पिनर ए.एम. गजनफरला मुख्य संघात स्थान मिळवता आले नाही. त्याचा समावेश राखीव (रिझर्व्ह) खेळाडूंमध्ये करण्यात आला असून, गजनफरसह एजाज अहमदजई आणि जिया उर रहमान शरीफी हे देखील राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असतील.
विश्वचषकापूर्वी सराव आणि तयारीचा भाग म्हणून अफगाणिस्तानचा हा संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका १९ ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार आहे.
२०२४ च्या टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत बाद फेरीत पोहोचण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. त्या प्रवासात त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांना धूळ चारली होती.
आगामी विश्वचषकात अफगाणिस्तानला गट ड (Group D) मध्ये स्थान मिळाले असून, त्यांच्यासोबत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, युएई आणि कॅनडा हे संघ आहेत. अफगाणिस्तान आपला पहिला सामना ८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.
राशिद खान (कर्णधार), इब्राहिम जादरान (उपकर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहिदुल्लाह कमाल, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी आणि अब्दुल्ला अहमदजई.