

दुबई : भारतीय युवा क्रिकेट संघाने मंगळवारी (१६ डिसेंबर) येथे सुरू असलेल्या ACC अंडर-19 आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी सामन्यात मलेशिया अंडर-१९ संघाचा ३१५ धावांनी अक्षरश: धुव्वा उडवला. भारतासाठी हा युवा एकदिवसीय क्रिकेटमधील धावांच्या फरकाने मिळवलेला दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
भारताच्या या विशाल विजयाचा शिल्पकार ठरला तो यष्टिरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडू, ज्याने वादळी द्विशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय युवा फलंदाज ठरला. कुंडूने १२५ चेंडूंमध्ये नाबाद २०९ धावांची ऐतिहासिक खेळी केली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.
दरम्यान, सलामीवीर वैभव सूर्यवंशी यानेही २६ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने वेगवान ५० धावा करून संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. तर वेदांत त्रिवेदीने १०६ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ९० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारत कुंडूला चांगली साथ दिली. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून ४०८ धावांचा डोंगर उभा केला.
४०९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाचा युवा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. मलेशियाचा डाव केवळ ३२.१ षटकांत ९३ धावांवर आटोपला. भारताच्या दीपांश देवेंद्रनने आपल्या भेदक गोलंदाजीने मलेशियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने ७ षटकांत २२ धावा देत ५ बळी घेतले. उद्धव मोहन यानेही २ गडी बाद केले. भारतीय १९ वर्षांखालील संघाने गट 'अ' मध्ये तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे आणि ते थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.