

दुबई : भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याची सप्टेंबर महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
२५ वर्षीय अभिषेकने आशिया चषक २०२५ मध्ये धमाकेदार कामगिरी करत सात सामन्यांमध्ये २०० च्या प्रभावी स्ट्राइक रेटने ३१४ धावा कुटल्या होत्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके (३ अर्धशतके) झळकावणारा फलंदाज होता. सर्वाधिक चौकार (३२) आणि सर्वाधिक षटकार (१९) मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर राहिला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणूनही निवडण्यात आले होते.
भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले होते.
अभिषेक शर्मा सध्या आयसीसी टी-२० फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, या प्रकारात सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने त्याचा संघसहकारी कुलदीप यादव आणि झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट यांना मागे टाकून महिन्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमान पटकावला.
आशिया चषकमधील या दमदार प्रदर्शनाच्या बळावरच अभिषेक शर्माने आयसीसी टी२० फलंदाजी क्रमवारीत इतिहास रचला. तो टी२० फलंदाजी क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुण (९३१) मिळवणारा खेळाडू ठरला. त्याने २०२० मध्ये इंग्लंडच्या डेव्हिड मलानने नोंदवलेला ९१९ रेटिंग गुणांचा विक्रम मोडीत काढला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला, ‘‘आयसीसीचा हा पुरस्कार जिंकून अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे, हे बक्षीस महत्त्वपूर्ण सामन्यांमधील माझ्या कामगिरीसाठी मिळाले, ज्यांच्या मदतीने भारताला विजय मिळवता आला. अत्यंत कठीण परिस्थितीतही विजय मिळवण्याची क्षमता असलेल्या संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. टी-२० सामन्यांमधील आमची अलीकडील कामगिरी उत्कृष्ट सांघिक आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवते.’’
महिलांच्या गटात हा पुरस्कार भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने पटकावला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या देशांतर्गत एकदिवसीय मालिकेत तिने उत्कृष्ट कामगिरी केली. तीन सामन्यांमध्ये तिने अनुक्रमे ५८, ११७ आणि १२५ धावांची खेळी केली. भारतीय महिला संघाच्या उपकर्णधार असलेल्या स्मृतीने या मालिकेतील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये ७७ च्या सरासरीने आणि १३५.६८ च्या स्ट्राइक रेटने ३०८ धावा केल्या. या दरम्यान, एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली. तिने विराट कोहलीचा विक्रम मोडून हा टप्पा गाठला.
या पुरस्काराच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेची तजमीन ब्रिट्स आणि पाकिस्तानची सिदरा अमीन यांचाही समावेश होता.
हा सन्मान मिळाल्यावर स्मृती मानधना म्हणाली, ‘‘अशा प्रकारचा सन्मान एक खेळाडू म्हणून तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देतो. सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून संघासाठी विजय मिळवणे हेच माझे नेहमी ध्येय राहिले आहे.’’