FIDE Grand Swiss 2025 | 16 वर्षीय अभिमन्यूने भेदला डी. गुकेशचा ‘चक्रव्यूह’!

विश्वविजेत्याला नमवणारा पहिला षोडषवर्षीय बुद्धिबळपटू
FIDE Grand Swiss 2025
FIDE Grand Swiss 2025 | 16 वर्षीय अभिमन्यूने भेदला डी. गुकेशचा ‘चक्रव्यूह’!Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

ताश्कंद; वृत्तसंस्था : सर्वसाधारणपणे कोणत्याही किशोरवयीन मुलाला विद्यमान विश्वविजेत्याला आव्हान देण्याची कल्पनाही रोमांच आणणारी; पण अमेरिकेच्या 16 वर्षीय बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्राने मात्र त्याही पुढे पाऊल टाकत अवघ्या बुद्धिबळ विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. उझबेकिस्तान येथे सुरू असलेल्या ‘ग्रँड स्विस’ स्पर्धेत अतिशय शांत चित्ताने, एकाग्रतेने आपला गेमप्लॅन पटावर उतरवत त्याने चक्क विद्यमान विश्वजेत्या डी. गुकेशला धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला.

अभिमन्यू मिश्राने ‘ग्रँड स्विस’च्या पाचव्या फेरीत गुकेशला 61 चालींमध्ये पराभूत करून क्लासिकल बुद्धिबळात विश्वविजेत्याला हरवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मान मिळवला. 2024 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी चीनच्या डिंग लिरेनला हरवून गुकेशने सर्वात कमी वयात विश्वविजेतेपद पटकावून इतिहास रचला होता. त्याआधी तो वयाच्या 17 व्या वर्षी सर्वात कमी वयात ‘फिडे कँडिडेंटस्’ जिंकणारा खेळाडू ठरला होता.

मिश्राने यावेळी गुकेशला नमवताना 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. याआधी हा विक्रम अमेरिकेचाच ग्रँडमास्टर गाटा काम्सकीच्या नावावर होता. त्याने 17 व्या वर्षी गॅरी कास्पारोव्हला हरवले होते. विश्वविजेता असल्याने गुकेशला 2026 च्या ‘कँडिडेंटस्’ स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार होता. तरीही, स्वतःची तयारी तपासण्यासाठी आणि फॉर्म टिकवण्यासाठी त्याने ‘ग्रँड स्विस’मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला; पण या सामन्याने त्याला एक मोठा धडा शिकवला. काळ्या प्याद्याने खेळताना गुकेशने 12 व्या चालीत एक चुकीची चाल खेळली. यामुळे तो सुरुवातीपासूनच अडचणीत आला. या सामन्याकडे हॉलमधील 16 ग्रँडमास्टर्सचे बारीक लक्ष होते.

कोण आहे अभिमन्यू मिश्रा?

* अमेरिकेच्या न्यू जर्सी शहरात 5 फेब्रुवारी रोजी अभिमन्यू मिश्राचा जन्म झाला. त्याचे वडील हेमंत मिश्रा मूळचे भोपाळचे आहेत.

* मिश्राने लहानपणापासूनच अनेक विक्रम मोडले आहेत. त्याने ग्रँडमास्टर सर्जेई कर्जाकिनचा 19 वर्षांचा विक्रम मोडला. कर्जाकिन 12 वर्षे आणि 7 महिन्यांचा असताना ग्रँडमास्टर बनला होता.

* मिश्रा 12 वर्षे, 4 महिने आणि 25 दिवसांचा असताना 30 जून 2021 रोजी ग्रँडमास्टर बनला. तो आजपर्यंतचा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर आहे.

* त्याने 2021 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या एका स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर लिओन ल्यूक मेंडोन्काचाही पराभव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news