पुढारी ऑनलाईन डेस्क : Abhimanyu Easwaran : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्ष अखेरीस सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची भारतीय संघाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेच्या निकालानंतर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनल गाठणार का? हे ठरवले जाईल. दरम्यान बीसीसीआयसाठी कांगारूंविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचे शिलेदार निवडणे कठीण काम असेल. खरं तर, अनेक खेळाडू गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. याच्या जोरावर त्यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी दावा ठोकला आहे. यामध्ये अभिमन्यू ईश्वरनचे नाव आघाडीवर आहे.
सध्या इराणी चषक स्पर्धा सुरू असून यात रणजी विजेते मुंबई आणि शेष भारत यांच्यात सामना रंगला आहे. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात शेष भारताचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने शतक झळकावले आहे. सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने सर्फराज खानच्या शतकाच्या जोरावर 537 धावा केल्या. बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनने सलग तिसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने 117 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या.
यापूर्वी, दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ब संघाचे नेतृत्व करताना ईश्वरनने सलग दोन शतके झळकावली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत त्याने शतके झळकावली. त्याने भारत सी विरुद्ध नाबाद 159 , तर भारत डी विरुद्ध 116 धावांची शानदार खेळी केली. तर रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून द्विशतक झळकले होते. आता इराणी चषक स्पर्धेत त्याने शेष भारत संघाकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग तिसरे शतक झळकावले आहे. अशाप्रकारे त्याचे हे सलग 5 सामन्यातील चौथे शतक ठरले आहे. टीम इंडियाचे निवडकर्ते निश्चितपणे ईश्वरनच्या कामगिरीवर लक्ष ठेवतील.
29 वर्षीय अभिमन्यू देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो आणि भारत अ संघाचा कर्णधारही आहे. या सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या 97 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 48.5 च्या सरासरीने 7316 धावा केल्या आहेत ज्यात 25 शतके आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. 233 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. अशा प्रतिभावान फलंदाजाचे अद्याप टीम इंडियासाठी पदार्पण झालेले नाही. गेल्या काही वर्षांत त्याला अनेकदा भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे. मात्र, प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळाले नाही. त्याच्या पाठोपाठ आलेल्या यशस्वी जैस्वालने पदार्पण करून आपली जागा पक्की केली पण ईश्वरन अजूनही वेटींग लिस्टवरच आहे.