

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. अलीकडेच या 37 वर्षीय खेळाडूने टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून दिले. या शानदार कामगिरीनंतर त्याचे नाव दिग्गज कर्णधारांच्या यादीत नोंदवले. संपूर्ण स्पर्धेत त्याने आपल्या नेतृत्व गुणाने प्रभावित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितच्या निवृत्तीबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण खुद्द रोहितनेच या आपण निवृत्ती घेणार नसून याबाबत अफवा पसरवू नका असे टीकाकारांचे कान टोचले होते.
दरम्यान, द. आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स रोहितच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. एबीडीने भारतीय कर्णधाराविषयी मोठे विधान केले आहे. तो म्हणाली की, ‘रोहितला निवृत्त होण्याची गरज नाही. तो वनडे क्रिकेटमधील महान कर्णधार बनेल.’
डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, ‘रोहितची विजयाची टक्केवारी 74 आहे, जी इतर माजी कर्णधारांपेक्षा तुलनेत चांगली आहे. जर तो खेळत राहिला तर सर्व काळातील सर्वोत्तम वनडे कर्णधारांपैकी एक होईल. मग त्याने निवृत्ती का घ्यावी? त्याचा केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणूनही एक शानदार रेकॉर्ड राहिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जेव्हा दबाव शिगेला पोहोचला तेव्हा रोहितने जबाबदारी स्वीकारली. त्याने 76 धावा करून भारताला चांगली सुरुवात करून दिली आणि विजयाचा पाया रचला.’
रोहित शर्माकडे निवृत्त होण्याचे आणि कोणतीही टीका सहन करण्याचे कारण नाही. त्याचे रेकॉर्डच बोलते. एवढेच नाही तर त्याने त्याचा खेळही बदलला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट खूप कमी राहिला. एक सलामीवीर फलंदाज म्हणून निराशाजनक दिसतो. पण 2022 पासून त्याचा स्ट्राईक रेट पहिल्या पॉवरप्लेमध्ये 115 आहे, हाच चांगला आणि उत्कृष्ट यातील फरक आहे. जो खेळातील बदल अधोरेखीत करतो. तुमच्याकडे नेहमीच काहीतरी शिकण्यासारखे असते आणि काहीतरी सुधारण्यासारखे असते. रोहितने हे कष्टाने साध्य केले आहे,’ असेही मत डिव्हिलियर्सने व्यक्त केले आहे.