World Championship of Legends 2025 |मैदानात 'मिस्टर ३६०'चं चक्रीवादळ; कागारूं गोलंदाजांची पळता भुई थोडी
एजबॅस्टन : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. इंग्लंडविरुद्ध वादळी शतक केल्यानंतर, डिव्हिलियर्सने आपला मोर्चा ऑस्ट्रेलियाकडे वळवला आणि अवघ्या ३९ चेंडूंत तुफानी शतक ठोकत क्रिकेट विश्वाला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या खेळीने जुन्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा 'मिस्टर ३६०' च्या नावाने गोलंदाजांच्या मनात धडकी भरायची.
डिव्हिलियर्सच्या बॅटमधून धावांचा पाऊस
रविवारी दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिका चॅम्पियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय डिव्हिलियर्सने सार्थ ठरवला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या एबी डिव्हिलियर्सने ४६ चेंडूत १२३ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात १५ चौकार आणि ८ षटकार ठोकले. ४१ वर्षीय खेळाडूचे या स्पर्धेत दुसरे शतक आहे. डार्सी शॉर्टच्या १३ व्या षटकात एबी डिव्हिलियर्सने सलग तीन चौकार मारले. पहिल्या चेंडूवर चौकार मारून त्याने १०० धावा पूर्ण केल्या.
डिव्हिलियर्सच्या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेला धावसंख्या गडगडली
डिव्हिलियर्स जोपर्यंत क्रिजवर होता, तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावगती प्रचंड होती. तो बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या १३.३ षटकांत १८७ होती. मात्र, पीटर सिडलने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवताच संघाचा डाव गडगडला. डिव्हिलियर्सच्या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संघाने पुढच्या ५४ धावांत तब्बल ६ विकेट गमावल्या. त्यामुळे २० षटकांत ६ गडी गमावून संघाला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. डिव्हिलियर्सव्यतिरिक्त जेजे स्मट्सने ५३ चेंडूंत ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण त्याला इतरांची साथ मिळाली नाही.
या स्पर्धेतील डिव्हिलियर्सचे दुसरे शतक
या स्पर्धेतील हे डिव्हिलियर्सचे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध ४१ चेंडूंत शतक झळकावले होते. चार सामन्यांत ३०३ धावांसह तो २०२५ च्या 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स'मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. निवृत्तीनंतरही डिव्हिलियर्सचा फिटनेस आणि त्याचा खेळ पाहता, तो आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तितकाच प्रभावी ठरू शकतो, हेच त्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.

