
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ind vs SA 1st Test LIVE : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या दुसऱ्या डावात चार गडी गमावून 94 धावा केल्या. कर्णधार डीन एल्गर सध्या 122 चेंडूत 52 धावांवर नाबाद आहे. आफ्रिकेला विजयासाठी अजून 211 धावांची गरज आहे. त्याचवेळी भारत विजयापासून अवघ्या सहा विकेट्स दूर आहे. गुरुवारी कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी किमान 90 षटकांचा खेळ होईल. मात्र, पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे.
चौथ्या दिवसाच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने केशव महाराजला शानदार यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. त्याचबरोबर पंचांनी खेळ थांबवण्याची सूचना केली. भारताकडून बुमराहने दोन बळी घेतले. याशिवाय मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एडन मार्करामने 1, कीगन पीटरसनने 17, रुसी व्हॅन डर ड्युसेनने 11 आणि केशव महाराजने 8 धावा केल्या. एल्गरने कर्णधारपदाची खेळी खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील 18वे अर्धशतक झळकावले आणि एका टोकाला तो गोठला आहे. मात्र, पाचव्या दिवशी धावा काढणे त्याच्यासाठी सोपे नसेल.
४०.५ व्या षटकात बुमराहने नाईट वॉचमन केशव महाराज (८ धावा) याला क्लीन बोल्ड करून आफ्रिकेला चौथा धक्का दिला.
डीन एल्गरने कर्णधारपदाची खेळी खेळताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील १८ वे अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८०धावांच्या पुढे गेली. मात्र, एल्गर एक टोक सांभाळत संघाला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या त्याच्या साथीला नाईटवॉचमन केशव महाराज क्रीजवर आहे.
दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणी वाढत आहेत. ७४ धावांवर संघाला तिसरा धक्का बसला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रुसी व्हॅन डर डुसेनला क्लीन बोल्ड केले. डुसेनला ६५ चेंडूत ११ धावा करता आल्या. डुसेन आणि कर्णधार डीन एल्गर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. आतापर्यंत बुमराह, शमी आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ५० धावांच्या पुढे गेली आहे. व्हॅन डेर ड्युसेन आणि डीन एल्गर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने एक विकेट तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.
मोहम्मद सिराजने चहापानानंतर १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने कीगन पीटरसनला माघारी धाडले. पिटरसनने ३६ चेंडूत १७ धावा केल्या. ऋषभ पंतने विकेटच्या मागे त्याचा झेल पकडला. त्याने कर्णधार डीन एल्गरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 76 चेंडूत 33 धावांची भागीदारी केली.
दुस-या षटकाच्या तिस-या चेंडूवर मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिला धक्का दिला. त्याने द. आफ्रिकन संघाची पहिली विकेट पाडली. शमीने एडन मार्करामला बोल्ड केले. आऊट स्विंग खेळण्याच्या नादात मार्कराम प्लेड ऑन झाला. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन विकेटवर आदळला. मार्करामला एक धाव करता आली. यावेळी द. आफ्रिकेची धावसंख्याही १ च होती
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळला जात आहे. आज (दि. २९) सामन्याचा चौथा दिवस आहे. लंचनंतर भारताचा दुसरा डाव ५०.३ षटकांत १७४ धावांत आटोपला. ऋषभ पंतने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ धावा केल्या. रबाडा आणि नवोदित मार्को जॅन्सनने प्रत्येकी ४ बळी घेतले. अशा प्रकारे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावांची आघाडी घेतली. आता सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावा करायच्या आहेत.
या शतकात केवळ एकदाच या मैदानावर चौथ्या डावात ३०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. हा पराक्रम २००१/०२ दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत हंगामातील सामन्यात झाला. तिसऱ्या डावात १७४ धावांत ऑलआऊट झाल्यानंतर भारतीय संघाने केवळ ४ वेळा कसोटी सामना जिंकला आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या १ बाद १६ अशी होती. केएल राहुलने ५ आणि नाईटवॉच मॅन शार्दुल ठाकूरने ४ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाची एकूण आघाडी आता १४६ धावांवर पोहचली होती. तिसऱ्या दिवशी एकूण १८ विकेट पडल्या आणि २६८ धावा झाल्या. भारताचा पहिला डाव १०५.३ षटकात ३२७ धावांवर आटोपला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात भारताचा डाव १९७ धावांत आटोपला.