INDvsSA Test Day 4 : टीम इंडियाचा दुसरा डाव १७४ धावांत गुंडाळला, द. आफ्रिकेसमोर ३०५ धावांचे लक्ष्य | पुढारी

INDvsSA Test Day 4 : टीम इंडियाचा दुसरा डाव १७४ धावांत गुंडाळला, द. आफ्रिकेसमोर ३०५ धावांचे लक्ष्य

जोहान्सबर्ग : पुढारी ऑनलाईन : INDvsSA Test Day 4 : सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 174 धावांवर ऑलआऊट झाली. यजमान द. आफ्रिकेसमोर 305 धावांचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे सेंच्युरियनच्या मैदानावर आजपर्यंत कोणत्याही संघाने 250+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेले लक्ष्य द. आफ्रिका गाठेल का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

भारताचा ऑलआऊट… सिराज क्लिन बोल्ड

भारताचा दुसरा डाव १७४ धावांत आटोपला. आफ्रिकेसमोर ३०५ धावांचे लक्ष्य आहे. मार्को जॅन्सनने मोहम्मद सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा दुसरा डाव संपवला. जॅन्सनच्या चेंडूवर सिराजला मोठा फटका खेळायचा होता, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही आणि सिराज खातेही न उघडता क्लिन बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

Image

भारताला नववा धक्का…

कागिसो रबाडाने भारताला नववा धक्का दिला. त्याने शमीला मुल्डरकरवी झेलबाद केले. शमीने केवळ एक धाव केली. रबाडाचा चेंडू लेग-स्टंपवर होता आणि शमीला तो बाजूला खेळायचा होता, पण झटपट फटका मारण्याच्या नादात चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि थेट क्षेत्ररक्षकाकडे गेला.

भारताला आठवा धक्का

ऋषभ पंत ३४ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. रबाडाच्या चेंडूवर एन्गिडीने त्याचा झेल टिपला. त्यामुळे वेगवान धावा करण्याच्या भारताच्या आशाही संपुष्टात आल्या. पंतला पुढे जाऊन रबाडाविरुद्ध शॉट खेळायचा होता, पण त्याने पुन्हा एक शॉर्ट बॉल टाकला. यातच पंतने फटका मारलेला चेंडू थेट एन्गिडीकडे गेला. त्याने सोपा झेल घेत पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Image

भारताची सातवी विकेट…

रविचंद्रन अश्विन 14 धावा करून रबाडाचा बळी ठरला. पीटरसनने त्याचा झेल घेतला.

भारताची आघाडी 250 पार…

ऋषभ पंत आणि अश्विनने वेगवान फलंदाजी करत भारताची आघाडी 250 च्या पुढे नेली आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर आतापर्यंत कोणत्याही संघाला 249 धावांचे लक्ष्य गाठता आलेले नाही. अशा स्थितीत भारताचा विजय जवळपास निश्चित असल्याचे माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. आता संधी मिळाल्यास भारतीय वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

रहाणे 20 धावा करून बाद…

अजिंक्य रहाणे 23 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को जॅन्सनच्या चेंडूवर पुल शॉट खेळताना त्याने आपली विकेट दिली. या सत्रात भारताला वेगवान धावा करण्याची गरज आहे आणि त्यामुळेच भारतीय फलंदाज विकेट गमावत आहेत. पहिल्यांदा विराट ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर शॉट मारण्याच्या नादात बाद झाला आणि त्यानंतर पुल शॉट खेळताना रहाणेने त्याची विकेट गमावली.

Image

चेतेश्वर पुजारा 16 धावा करून बाद…

लुंगी एन्गिडीने भारताला 38 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाचवा धक्का दिला. त्याने चेतेश्वर पुजाराला यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. एन्गिडीचा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात होता, पुजाराने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला नीट लागला नाही आणि बॅटची बारीक कड घेऊन तो कीपरच्या ग्लोव्हमध्ये गेला. पुजारा अवघ्या 64 चेंडूत 16 धावा केल्या. पहिल्या डावात तो शुन्यावर बाद झाला होता. दुस-या डावात त्याच्याकडून मोठी धावसंख्या करण्याची अपेक्षा चाहत्यांना होती. पण तोही अपयशी ठरला असून त्याने चाहत्यांची निराशा केली आहे. चेतेश्वर पुजाराने गेल्या 43 डावांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. लुंगी एन्गिडीने पुजाराला दुसऱ्यांदा बाद केले.

Image

विराट कोहली 18 धावांवर बाद…

उपाहारानंतर पहिल्याच चेंडूवर (32.1 वे षटक) भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार कोहली 18 धावा करून बाद झाला. मार्को जॅन्सनने त्याला यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. विराटने पुन्हा एकदा जुनी चूक पुन्हा केली आणि तो चेंडू शरीराबाहेर खेळायला गेला. चेंडू त्याच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातमोज्यात गेला. विराटचा यंदाचा हा शेवटचा सामना होता आणि यंदाही त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. आता रहाणे पुजारासोबत क्रीजवर उपस्थित आहे.

कोहलीकडून चाहत्यांची निराश…

पहिल्या डावात 35 धावा करणारा भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या डावातही निराशा केली. चौथ्या दिवशी उपाहारानंतर मार्को जेन्सनच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककडे त्याचा झेल दिला. कोहली 32 चेंडूत 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावातही विराटने बाहेर जाणार्‍या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली आणि दुसऱ्या डावातही त्याच चुकीची पुनरावृत्ती केली. विराट कोहलीने गेल्या 60 डाव आणि 768 दिवसांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. 2021 मध्ये विराटने 11 कसोटी सामन्यांमध्ये 28.21 च्या सरासरीने एकूण 536 धावा केल्या.

लंच पर्यंत भारताची धावसंख्या 3 बाद 79

तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताची धावसंख्या 3 बाद 79 पर्यंत पोहचली आहे. त्याचबरोबर भारताची आघाडीही 209 धावांवर पोहचली. यावेळी कर्णधार विराट कोहली 18 आणि चेतेश्वर पुजारा 12 धावांवर क्रीझवर होते. सेंच्युरियन मैदानावर कोणत्याही संघाला 249 धावांपेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करता आलेला नाही. अशा परिस्थितीत भारताने 300 धावांचे लक्ष्य दिल्यास भारतीय संघाला सामना जिंकण्याची चांगली संधी आहे.

टीम इंडियाची आघाडी 200 पार…

28 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर षटकात विराट कोहलीने रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकला. पंचांनी हा चेंडू नो बॉल असल्याचा कौल दिला. त्यामुळे भारताला 5 धावा मिळाल्या. दरम्यान, यावेळी भारताची आघाडी 3 बाद 196 पासून 3 बाद 201 पर्यंत पोहचली.

राहुल अडकला एन्गिडीच्या जाळ्यात..

एन्गिडीने पुन्हा एकदा केएल राहुलला आपल्या जाळ्यात अडकवले. 22.3 व्या षटकात राहुल बाद झाला. पहिल्या स्लिपमध्ये एल्गरने त्याचा झेल पकडला. राहुलेने 74 चेंडूत 23 धावा केल्या. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणा-या चेंदूवर राहुलने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटची कडा घेवून स्लिपमध्ये उभा असणा-या एल्गरकडे गेला. एल्गरने कसलीही चूक केली नाही आणि झेल पकडला. राहुल बाद झाल्यानंत्र विराट कोहली फलंदाजीसाठी आला.

भारताचे अर्धशतक…

लुंगी एन्गिडी फेकत असलेल्या 18 व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर राहुलेने चौकार ठोकला आणि संघाचे अर्धशतक धावफलकावर झळकावले.

पुजाराला जीवदान…

16 षटकाच्या 4 चौथ्या चेंडूवर चेतेश्वर पुजाराला जीवदान मिळाले. लुंगी एन्गिडीला ऑन साइडला फटका मारतान चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि रबाडाच्या हाती चेंडू गेला. पण हा सोपा झेल रबाडाने सोडला. यावेळी पुजारा अवघ्या 2 धावांवर खेळत होता. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या पुजाराला आता धावा करण्याची चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन तो फॉर्ममध्ये परत येऊ शकतो अशी चाहत्यांना आशा आहे.

सहा षटकांनंतर राहुलच्या बॅटमधून धाव निघाली…

द. आफ्रिकन गोलंदाजांनी भारतावर दबाव कायम ठेवला आहे. शेवटच्या सहा षटकांमध्ये भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. यादरम्यान शार्दुल ठाकूरची विकेटही पडली. यानंतर राहुलने लेग साइडमध्ये चौकार मारून दबाव कमी केला. पुढच्याच चेंडूवर पुजारानेही चौकार मारला.

भारताची दुसरी विकेट…

कागिसो रबाडाने भारताला आणखी एक धक्का दिला आहे. त्याने 13 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर तिसर्‍या स्लिपमध्ये शार्दुलला मुल्डरकरवी झेलबाद केले. रबाडाने फेकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता. शार्दुलसारख्या फलंदाजाला बाद करण्यासाठी या चेंडूची लाईन लेन्थ पुरेशी होती. मात्र, शार्दुलने आपले काम केले असून दिवसाची पहिली सात षटके खेळून तो बाद झाला. आता रबाडा आणि एन्गिडीचा पहिला स्पेल खेळून काढण्याची जबाबदारी पुजारा आणि राहुलवर असेल.

आफ्रिकेचा पहिला रिव्ह्यू खराब…

आफ्रिकेने या डावाचा पहिला रिव्ह्यू वाया घालवला आहे. शार्दुल ठाकूर मार्को जॅन्सनचा चेंडू सोडण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू खूप पुढे गेला आणि स्विंग होऊन त्याच्या पॅडला लागला. यानंतर एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील झाले. पण पंचांनी हे अपील फेटाळले. त्यानंतर डीन एल्गरने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू विकेटवरून जात असल्याचे दिसले. त्यामुळे टीव्ही पंचांनी मैदानी पंचांचा नाबाद फलंदाज असल्याचा निर्णय कायम ठेवला. या डावातील द. आफ्रिकेचा पहिला रिव्ह्यू वाया गेला आहे. भारताच्या आघाडीने 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू…

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. केएल राहुल आणि शार्दुल ठाकूर क्रीजवर उपस्थित आहेत. रबाडाने दिवसाचे पहिले षटक केले आणि या षटकात भारताला सहा धावा मिळाल्या. भारताला आज वेगवान धावा करण्याची गरज आहे, तरच भारताच्या विजयाची शक्यता कायम आहे.

Back to top button