ऋषभ पंतच्या रडारवर धोनीचा विक्रम | पुढारी

ऋषभ पंतच्या रडारवर धोनीचा विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत 26 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढू शकतो. यष्टिरक्षक म्हणून पंतने 25 कसोटीत 97 विकेटस् मिळवल्या आहेत. सेंच्युरियनमध्ये होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने तीन विकेटस् मिळवल्या तर सर्वात जलद 100 विकेटस् घेणारा तो यष्टिरक्षक बनेल.

धोनीने 36 कसोटीत रचलेला विक्रम

एम. एस. धोनीने 36 कसोटी सामन्यांत 100 विकेटस् मिळवल्या होत्या. पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हे करण्यात यश मिळाले तर धोनीहून 11 कसोटी कमी खेळत तो हा विक्रम रचेल. सध्या धोनीच्या नावे यष्टीमागे सर्वात जलद 100 विकेट मिळवण्याचा विक्रम आहे. त्यानंतर वृद्धिमान साहा (37 कसोटी) दुसर्‍या स्थानी आहे. तिसर्‍या स्थानी किरण मोरे (39 कसोटी), चौथ्या स्थानी नयन मोंगिया (41 कसोटी) आणि पाचव्या स्थानी सय्यद किरमाणी (42 कसोटी) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे पंतला सर्वांच्या पुढे जाण्याची संधी आहे.

गेल्या वर्षभरात पंतने वेधले सर्वांचे लक्ष

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पंतने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. सिडनी कसोटी ड्रॉ करण्यात त्याने योगदान दिले. त्याने कठीण परिस्थितीत 97 धावांची खेळी केली. यानंतर ब्रिस्बेन कसोटीत ऋषभने 138 चेंडूंत नाबाद 89 धावा करीत भारताला विजय मिळवून दिला होता. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 असे नमविले. 2021 मध्ये पंतने 11 कसोटीमधील 19 डावांत 41.52 च्या सरासरीने 706 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोत्तम खेळी 101 होती. ही खेळी त्याने इंग्लंडविरुद्ध खेळली होती.

हेही वाचा :

Back to top button