दक्षिण आफ्रिका दौर्‍यात कोहलीला ‘हे’ विक्रम मोडण्याची संधी | पुढारी

दक्षिण आफ्रिका दौर्‍यात कोहलीला 'हे' विक्रम मोडण्याची संधी

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर आहे. या मालिकेत विराट कोहलीकडे अनेक मोठे-मोठे विक्रम मोडण्याची आणि नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम रडारवर

विराटने शेवटच्या आफ्रिका दौर्‍यात शतक ठोकल्यानंतर अंगठीला किस करीत शतक साजरे केले होते. या मालिकेत विराटने आणखी एक शतक ठोकल्यास कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकेठोकण्याचा विश्वविक्रम विराटच्या नावे होऊ शकतो. सध्या विराट आणि रिकी पाँटिंग 41 शतकांसह बरोबरीत आहेत.

द्रविडला मागे टाकणार?

राहुल द्रविडने आफ्रिकेविरुद्ध 21 कसोटी सामन्यांत 1,252 धावा केल्या आहेत. कोहलीने या मालिकेत 177 धावा केल्यास तो द्रविडला मागे टाकेल. असे झाल्यास कोहली आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीयांच्या यादीत तिसरे स्थान पटकावेल.

8 हजार धावांचा टप्पा

विराट कोहलीच्या सध्या कसोटी क्रिकेटमध्ये 7,801 धावा आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत 200 धावा पूर्ण करून 8 हजार कसोटी धावा गाठण्यास विराट कोहली सज्ज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.

100 वी कसोटी

विराट कोहलीने आतापर्यंत 97 कसोटी खेळल्या आहेत. मालिकेतील शेवटची कसोटी ही त्याची 100 वी कसोटी असणार आहे. या कामगिरीसोबतच विराट कोहलीला सचिन तेंडुलकर आणि इतर बड्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळेल. तो 100 वी कसोटी खेळणारा 12 वा भारतीय खेळाडू असेल.

नवा इतिहास रचण्याची संधी

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदाही कसोटी मालिका जिंकलेला नाही. भारतीय संघाने गेल्या तीन-चार वर्षांत कसोटी मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आफ्रिकेत मालिका विजयाचा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

Back to top button