प्रो-कबड्डी लीग : आजपासून घुमणार ‘कबड्डी-कबड्डी’ | पुढारी

प्रो-कबड्डी लीग : आजपासून घुमणार ‘कबड्डी-कबड्डी’

बंगळुरू : वृत्तसंस्था ; कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या सत्राचे आयोजन एकाच ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरणात बुधवारपासून होणार आहे. सामने पाहण्यास प्रेक्षकांना अनुमती नसेल. 12 संघांच्या लीगची सुरुवात माजी चॅम्पियन यू मुम्बा आणि बेंगळुरू बुल्स यांच्या सामन्याने होईल. तर, दिवसाच्या दुसर्‍या लढतीत तेलुगू टायटन्ससमोर तमिल थलाईवाजचे आव्हान असेल.

या सत्रात सुरुवातीचे चार दिवस आणि प्रत्येक शनिवारी तीन-तीन सामने होतील. बुधवारी होणार्‍या तिसर्‍या लढतीत गतविजेता बंगाल वॉरियर्ससमोर यूपी योद्धाचे आव्हान असेल. सातव्या सत्रातील सर्वाधिक गुण मिळवणारा पवन कुमार सेहरावतचा समावेश असलेल्या बेंगळुरू बुल्स संघाचा प्रयत्न युवा खेळाडूंचा सहभाग असलेल्या यू मुम्बाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा असेल. यू मुम्बाच्या प्रयत्न फजल अत्रचलीच्या नेतृत्वाखाली बचावात चांगल्या कामगिरीची असणार आहे.

दुसर्‍या लढतीत तेलुगु टायटन्सला सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार या अनुभवी चढाईपटूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तर, तमिल थलाईवाजच्या बचावाची जबाबदारी सुरजितकडे असेल. अन्य लढतीत बंगाल वॉरियर्स आपल्या अभियानाची सुरुवात यूपी योद्धासारख्या मजबूत संघाविरुद्ध करणार आहे. यूपीने पाचव्या हंगामात सहभागी झाल्यापासून कामगिरीत सातत्य राखले आहे. या हंगामातदेखील त्यांचा प्रयत्न चांगली कामगिरी करण्याचा असेल.

आजचे सामने (22 डिसेंबर 2021)

बंगळुरू बुल्स वि. यू मुम्बा : (संध्या. 7.30 वा.)

तेलुगु टायटन्स वि. तमिळ थलाईवाज : (संध्या. 8.30 वा.)

बंगाल वॉरियर्स वि. यूपी योद्धा : (रात्री 9.30 वा.)

Back to top button