KL Rahul : केएल राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार! | पुढारी

KL Rahul : केएल राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार!

जोहन्सबर्ग; पुढारी ऑनलाईन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अनुभवी सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul Captain) कसोटी संघाचा नवा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आल्यावे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

केएल जबरदस्त फॉर्ममध्ये… (KL Rahul)

केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राहुलने (KL Rahul) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली योग्यता सिद्ध केली आहे. इंग्लंड दौऱ्यातून त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आणि त्याने ८ डावात ३९.३८ च्या सरासरीने एकूण ३१५ धावा केल्या. राहुलने २०१४ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत झालेल्या ४० कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने ३५.१७ च्या सरासरीने २३२१ धावा केल्या आहेत. ६८ डावांमध्ये राहुलने ६ शतके आणि १२ अर्धशतके केली आहेत.

रोहितला दुखापत

आफ्रिका दौर्‍यासाठी निवडलेल्या कसोटी संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले होते. सोमवारपासून ते तीन दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये होते. काही खेळाडूंनी कसून सराव केला. सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली आणि त्यामुळेच त्याचे आता कसोट मालिकेत खेळणे रद्द झाले आहे. कसोटी मालिकेनंतर कदाचित तो वनडे मालिकेत खेळू शकेल, अशी शक्यता आहे.

रोहितची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का असणार आहे. २०२१ मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच, नुकतीच त्याची कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून निवड केली गेली आहे. २०१९ च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकपासून रोहितचे कसोटीत सलामीला प्रमोशन झाले. त्यानंतर त्याने १६ कसोटीत ५८.४८ च्या सरासरीने १,४६२ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे.

प्रियांक पांचाळला रोहितच्या जागी संघात स्थान

सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, रोहितच्या पायाचे स्नायू ताणले गेले आहेत. गुजरातचा 31 वर्षीय सलामीवीर प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याला रोहितच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. भारत अ संघासोबत प्रियांक सध्या दक्षिण आफ्रिकेतच खेळत आहे.

31 वर्षीय पांचाळ (Priyank Panchal) हा सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांमध्ये फारसा ओळखीचा चेहरा नसला तरी तो स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरात संघाचे नेतृत्व सांभाळतो. मागील काही वर्षांपासून तो भारत ‘अ’ संघाचा नियमित सदस्य आहे. त्याच्याकडे 100 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. तो सध्या भारत ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर आहे आणि तेथे त्याने 96, 24 व 0 अशी तीन डावांत खेळी केली आहे. रणजी करंडक 2016-17 च्या पर्वात पांचाळने 17 डावांत 87.33च्या सरासरीने 1,310 धावा केल्या होत्या.

पांचाळने (Priyank Panchal) पार्थिव पटेलनंतर गुजरातचे नेतृत्व केले. यादरम्यान तो भारत अ संघातही सातत्याने खेळला. 2016-17 च्या रणजी हंगामापासून पांचाळची कारकीर्द चांगली आहे, जिथे त्याने 17 डावात 87.33 च्या सरासरीने 1310 धावा केल्या. त्याची प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ३१४ आहे, जी त्याने त्याच मोसमात पंजाबविरुद्ध केली होती. त्यामुळेच गुजरातला त्यावर्षी पहिले रणजी जेतेपद पटकावण्यातही यश आले होते.

Back to top button