T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडला लॉटरी! सुपर 8 मध्ये प्रवेश, स्कॉटलंड बाहेर

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडला लॉटरी! सुपर 8 मध्ये प्रवेश, स्कॉटलंड बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T-20 विश्वचषक 2024 च्या 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले.

स्कॉटलंडने आपल्या स्फोटक कामगिरीने इंग्लंडला 2024 च्या T20 विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी निश्चितच वातावरण निर्माण केले, पण अखेरीस अनुभवी ऑस्ट्रेलियाचा विजय जोस बटलरच्या संघासाठी दिलासादायक ठरला. नामिबियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर इंग्लंडला स्कॉटलंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव आवश्यक होता. असे झाले तरच इंग्लिश संघाला 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 चे तिकीट मिळू शकणार होते. आणि अगदी तसेच झाले. स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. तरीही त्यांना 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. यासह इंग्लिश संघ 5 गुणांसह सुपर-8 साठी पात्र ठरला. त्यांचा रन रेट स्कॉटलंडपेक्षा जास्त राहिला. ज्यामुळे स्कॉटलंडला ब गटात तिस-या स्थानी समाधान मानावे लागले.

स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाला 181 धावांचे लक्ष्य

स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियासमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले होते. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने 60, कर्णधार रिची बेरिंग्टनने नाबाद 42, जॉर्ज मुनसेने 35 आणि मॅथ्यू क्रॉसने 18 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने दोन बळी घेतले. ॲश्टन अगर, नॅथन एलिस आणि ॲडम झम्पा यांनी 1-1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 2 चेंडूत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या या धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी अप्रतिम खेळी खेळली. या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. हेडने 49 चेंडूत 68 तर स्टोइनिसने 29 चेंडूत 59 धावा केल्या. याशिवाय टीम डेव्हिडने 14 चेंडूत नाबाद 24 धावांची उपयुक्त खेळी साकारली.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या पाचव्या षटकात मायकेल जोन्सने ट्रॅव्हिस हेडचा झेल सोडला. त्यावेळी तो 17 धावांवर फलंदाजी करत होता. कॅच ड्रॉप संघाला महागात पडला, कारण हेडने मार्कस स्टॉइनिससोबत 80 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी 49 चेंडूत 68 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा सामना जिंकला.

स्टॉइनिस सामनावीर

ऑस्ट्रेलियाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने 29 चेंडूत 59 धावांची खेळी केली. स्टॉइनिस आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी झाली. स्टॉइनिसला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news