T20 World Cup : भारत-पाक सामन्याचे ऐतिहासिक स्टेडियम जमीनदोस्त, कारण.. | पुढारी

T20 World Cup : भारत-पाक सामन्याचे ऐतिहासिक स्टेडियम जमीनदोस्त, कारण..

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार असणारे न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियम जमीनदोस्त केले जाणार आहे. या स्टेडियमवर एकूण 8 सामने खेळले गेले. 12 जून रोजी शेवटचा सामना झाला. ज्यामध्ये भारताने अमेरिकेचा पराभव केला. आता हे स्टेडियम 14 जूनला पाडण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. जगभरात क्रिकेटचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सहयजमानपद अमेरिकेकडे सोपवले. याच्या माध्यमातून अमेरिकेत प्रथमच आयसीसीची सर्वात मोठी स्पर्धा खेळवली जात आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये फक्त टी-20 विश्वचषक सामन्यांसाठी तात्पुरते स्टेडियम बांधण्यात आले होते. जे नासाऊ काउंटी स्टेडियम म्हणून ओळखले गेले.

या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी आठपैकी तीन सामने जिंकले, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी पाच सामने जिंकले. हे मैदान भारतासाठी लकी ठरले. या स्टेडियममध्ये भारतीय संघाने आपले सर्व गट सामने खेळले. या तीनही सामन्यात रोहित सेनेने विजय मिळवला. 12 जूनला टीम इंडियाने अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव करत सुपर-8 मध्ये आपले स्थान पक्के केले. या सामन्यानंतर हे स्टेडियम पाडण्याचे काम सुरू झाले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या एक्स अकौंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये घटनास्थळाजवळ एक बुलडोझर दिसत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच टी-20 विश्वचषकासाठी बांधलेले हे स्टेडियम लवकरच पाडण्यात येणार आहे.

मैदान उभारण्यास 248 कोटी रुपये खर्च

अहवालानुसार, नासाऊ काउंटी स्टेडियम हे एक मॉड्यूलर स्टेडियम होते. जे तयार करण्यासाठी तब्बल 248 कोटी रुपये खर्च करण्यात आले. स्टेडियच्या उभारणीसाठी 106 दिवस लागले. त्याची सुरुवात सप्टेंबर 2023 मध्ये झाली. स्टेडियमची एकूण आसन क्षमता 34000 होती. आता हे स्टेडियम अवघ्या 6 आठवड्यांत पाडले जाणार आहे.

स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचचा वापर

नासाऊ क्रिकेट स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचचा वापर करण्यात आला. ही खेळपट्टी ॲडलेडमधून मागवण्यात आली होती. या खेळपट्टीवरची सर्वाधिक धावसंख्या 137 आहे. स्टेडियम पाडल्यानंतर येथील खेळपट्टीचे आयझेनहॉवर पार्कमध्ये जतन करण्यात येणार आहे. या खेळपट्टीचा स्थानिक क्रिकेट क्लबचे खेळाडू लाभ घेऊ शकणार आहेत.

स्टेडियमच्या खेळपट्टीवरून वाद

2024 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम वादात सापडले. हे स्टेडियम 106 दिवसांत तयार झाले. कदाचित त्यामुळेच खेळपट्टीवर असमान उसळी आणि गोलंदाजांना जास्त मदत मिळाली. खेळपट्टीचे स्वरूप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि आयसीसीनेही ते मान्य केले. या स्टेडियममध्ये झालेल्या सर्व सामन्यांचा रसिकांनी आनंद लुटला. लो स्कोअरींग सामन्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा दिसून आला. भारत-पाक सामनाही असाच झाला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 119 धावा केल्या, परंतु पाकिस्तानला या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही आणि सामना 6 धावांनी गमावला.

Back to top button