टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकसाठी लाजिरवाणे 5 विक्रम

टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकसाठी लाजिरवाणे 5 विक्रम

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणार्‍या टीम इंडियाने पाकिस्तानला 120 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, बाबर आझमच्या संघाला 20 षटकांत 7 बाद 113 धावाच करता आल्या. टी-20 विश्वचषकाचा विचार करता या सामन्यात 5 असे विक्रम झाले, ते पाहून पाकिस्तानची मान शरमेने खाली जाईल.

सर्वात लहान धावसंख्येचा बचाव

झिम्बाब्वेच्या नावावर टी-20 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा विक्रम आहे. त्यांनी 2021 मध्ये 119 धावांचा बचाव केला होता. आता या यादीत भारताचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारताने 120 धावांचे लक्ष्य देऊन त्याचा यशस्वी बचाव केला.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय

टी-20 विश्वचषकात एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत 7 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाला इतर कोणत्याही संघाने एवढ्या वेळा पराभूत केलेले नाही.

सर्वात लहान लक्ष्याचा यशस्वी बचाव

टी-20 विश्वचषकात सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्यात भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध 120 धावांचा यशस्वी बचाव केला होता. आता या यादीत श्रीलंकेसह भारताचेही नाव जोडले गेले आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने यशस्वी बचावाच्या बाबतीत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.

भारतीय संघाकडून सर्वात लहान लक्ष्याचा यशस्वी बचाव

भारताने टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा नवा विक्रम केला. याआधी भारताने 2016 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध टी-20 मध्ये 139 धावांचा यशस्वी बचाव केला होता. तो विक्रम भारताने पाकविरुद्ध मोडला.

पाकिस्तानने भारताला प्रथमच ऑलआऊट करूनही पराभव

न्यूयॉर्कच्या सामन्यात पाकिस्तानने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला ऑल आऊट केले. याआधी टी-20 मध्ये पाकिस्तानने भारताला ऑल आऊट केले नव्हते. या सामन्यात पाकिस्तानला ही किमया साधता आली तरीही त्यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news