

पुढारी ऑनलाईन डेस्क : Puja Tomar UFC : अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (UFC) मध्ये विजयाची नोंद करणारी पूजा तोमर ही भारताची पहिली मिश्र मार्शल आर्ट फायटर ठरली आहे. पूजाने शनिवारी (52 किलो) यूएफसी लुईव्हिल येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ब्राझीलच्या रायन डोस सँटोसचा 30-27, 27-30, 29-28 असा पराभव केला. पूजा ही प्रथमच अशा स्पर्धेत सहभागी झाली आहे.
सामन्यानंतर पूजा म्हणाली, 'हा फक्त माझा विजय नाही. उलट, हा भारताच्या सर्व चाहत्यांचा आणि भारतीय लढवय्यांचा विजय आहे. पूर्वी प्रत्येकाला वाटत असे की भारतीय लढवय्ये आव्हान देऊ शकत नाहीत. मी फक्त जिंकण्याचा विचार करत होते आणि मी जिंकून दाखवले आहे.'
'सायक्लोन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या 30 वर्षीय पूजाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये UFC सोबत करार केला आणि अशा प्रकारे मिश्र मार्शल आर्ट्सच्या सर्वात मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली. अंशुल ज्युबिली आणि भरत कंडारे यांनी UFC मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्यांना पदार्पणाचा सामना जिंकता आला नाही.
पूजा पुढे म्हणाली, 'मला जगाला दाखवायचे आहे की भारतीय खेळाडू हे लढवय्ये आहेत. आम्ही अजिबात थांबणार नाही. आम्ही लवकरच UFC चॅम्पियन बनू. माझा विजय फायटर्स आणि भारतीय चाहत्यांना समर्पित आहे. मला भारतीय असण्याचा खूप अभिमान वाटतो. माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. मी ठरवले होते की मला फक्त जिंकायचे आहे. मी स्वतःमध्ये आणखी सुधारणा करेन.'
पूजा आणि रायन डोस सँटोस यांनी तीन फेऱ्या खेळल्या. पूजाने 2023 मध्ये UFC सोबत करार केला होता. UFC सोबत करार करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील बुढाना गावात जन्मलेल्या पूजाने तिच्या करिअरची सुरुवात वुशूमधून केली. या खेळात तिने पाच राष्ट्रीय विजेतेपदेद पटकावले.
माजी राष्ट्रीय वुशु चॅम्पियन असलेल्या तोमरने मॅट्रिक्स फाईट नाईट आणि वन चॅम्पियनशिपसह इतर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे. सलग चार पराभवानंतर, तिने वन चॅम्पियनशिप सोडली आणि 2021 मध्ये मॅट्रिक्स फाईट नाईटमध्ये सामील झाली. जुलैमध्ये रशियाच्या अनास्तासिया फेओफानोव्हाविरुद्ध तिने शेवटचे विजेतेपद राखून MFN येथे चार लढती जिंकल्या. रिपोर्ट्सनुसार, ती बाली, इंडोनेशिया येथील सोमा फाईट क्लबमध्ये प्रशिक्षण घेते, जिथे अंशुल ज्युबिलीने यूएफसीसाठी प्रशिक्षण घेतले.