पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत टी-20 विश्वचषक 2024 सुरु झाला आहे. टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पण, त्याआधी आयसीसीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला न्यूयॉर्क येथे एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. रविवारी (दि. 2) कोहलीला ICC ODI Player of the Year चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयसीसी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोहलीच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे.
ICC ने शेअर केला व्हिडिओ
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC)ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये कोहलीचे ट्रॉफीसह दिसत आहे. कोहलीला या पुरस्काराची कॅपही देण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 2023 मध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोहलीला हा पुरस्कार मिळाला आहे.
टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ अमेरिकेत पोहचला आहे. कोहली या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून संघाला त्याच्याकडून उत्कृष्ट खेळीची अपेक्षा आहे. कोहलीही या स्पर्धेत खेळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघात सामील झाला आहे.
2023 मध्ये कोहलीने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला. त्याने 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 शतके आणि 8 अर्धशतकांसह एकूण 1377 धावा फटकावल्या. 2023 मध्ये कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 166 होती. एवढेच नाही तर त्याने एकदिवसीय विश्वचषकातील 11 सामन्यात 765 धावा केल्या. ज्यामध्ये त्याच्या नावावर 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. आता कोहली टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी अमेरिकेत पोहचला आहे. कोहली तो टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत या विश्वचषकातही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
टीम इंडियाने शनिवारी (1 जून) बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला. ज्यामध्ये कोहली खेळला नाही. या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. भारतीय संघ 5 जूनला टी-20 विश्वचषकात आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 2007 साली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाला टी-20 चे विजेतेपद जिंकता आलेले नाही. इंग्लंडचा संघ 2022 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.