लंडन; वृत्तसंस्था : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आपल्या खेळाडूंना परत बोलवायला नको होते, त्यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापेक्षा 'आयपीएल'मध्ये खेळले असते, तर ते जास्त फायद्याचे झाले असते, असा घरचा आहेर माजी कसोटीपटू आणि समालोचक मायकेल वॉन याने 'ईसीबी'ला दिला आहे.
'आयसीसी' टी-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी अनेक परदेशी खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून माघार घेतली आणि आपापल्या मायदेशी परतले, यात इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या जास्त होती. कारण, इंग्लंडला या वर्ल्डकप आधी पाकिस्तान संघासोबत टी-20 आय सामना खेळायचा होता. या मालिकेतील दुसरा सामना खूपच एकतर्फी झाला, त्या पार्श्वभूमीवर वॉन याने हे विधान केले आहे.
मायकेल वॉन म्हणाला, मला वाटते की इंग्लंड बोर्डाने एक चूक केली की त्यांनी 'आयपीएल'मधून सर्व खेळाडूंना परत बोलावले. विल जॅक, फिल सॉल्ट, जोस बटलर यांचे संघ 'आयपीएल'च्या प्ले-ऑफमध्ये होते. त्यांना ते सामने खेळू द्यायला पाहिजे होते. कारण, तेव्हा लोकांच्या अपेक्षांचा दबाव खूप जास्त असतो. पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामने खेळण्यापेक्षा 'आयपीएल'मध्ये खेळल्याने किमान टी-20 वर्ल्डकपच्या द़ृष्टीने चांगली तयारी तरी झाली असती. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विरोधात नाही; पण 'आयपीएल'मध्ये खूप दडपण असते आणि अशा स्थितीत जर खेळाडू खेळले असते, तर त्यांची तयारी अधिक चांगली झाली असती. विशेषतः विल जॅक आणि फिल सॉल्ट 'आयपीएल'मध्ये खेळले असते, तर खूप चांगले झाले असते.