Yuzvendra Chahal Record : युझवेंद्र चहलचे IPL मध्ये बळींचे ‘द्विशतक’! नबीची विकेट घेऊन रचला इतिहास

Yuzvendra Chahal Record : युझवेंद्र चहलचे IPL मध्ये बळींचे ‘द्विशतक’! नबीची विकेट घेऊन रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yuzvendra Chahal Record : राजस्थान रॉयल्स (RR) चा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 38 व्या सामन्यात इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीगमध्ये 200 बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद नबी (23)ला बाद करताच त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

चहलची आयपीएल कारकीर्द

2013 पासून आयपीएल खेळत असलेल्या चहलने स्पर्धेतील 153व्या आयपीएल सामन्यात 200 बळी पूर्ण केले. दशकभराच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने सुमारे 21 च्या सरासरीने या विकेट घेतल्या आहेत. 40 धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तो आरआरपूर्वी मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) या संघांकडून खेळला आहे.

चहलने आयपीएल 2022 मध्ये पर्पल कॅपही जिंकली

आयपीएल 2022 मध्ये चहलने 17 सामन्यात 19.52 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट घेतल्या होत्या. त्या मोसमात तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा तो इम्रान ताहिरनंतरचा दुसरा लेग स्पिनर ठरला. ताहिरने आयपीएल 2019 मध्ये सर्वाधिक 26 विकेट घेतल्या होत्या. चहलने आयपीएलच्या 5 हंगामात 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.

आरआरसोबत चहलची कामगिरी कशी आहे?

आयपीएल 2022 मध्ये आरआरसाठी पर्पल कॅप जिंकल्यानंतर चहलने आयपीएल 2023 मध्येही चमत्कार केला. गेल्या मोसमात त्याने 14 सामन्यांत 20.57 च्या सरासरीने आणि 8.18 च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट घेतल्या होत्या. त्याने आतापर्यंत राजस्थान संघासाठी 60 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. शेन वॉटसन (67) आणि सिद्धार्थ त्रिवेदी (65) नंतर तो आरआरसाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.

आरसीबीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

चहलने 2014 ते 2021 पर्यंत RCB चे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने 113 सामने खेळून 22.03 च्या सरासरीने आणि 7.58 च्या इकॉनॉमी रेटने 139 बळी घेतले. दरम्यान, त्याने 2 सामन्यात 4-4 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय आरसीबी संघातील अन्य कोणत्याही गोलंदाजाला 100 बळींचा आकडा गाठता आलेला नाही. केवळ हर्षल पटेलने 99 बळी घेतले आहेत.

एमआयच्या चॅम्पियन संघात

मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. चहल त्या संघाचा एक भाग होता. त्या हंगामात चहने फक्त 1 सामना खेळला, ज्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.

आयपीएलमध्ये 50 विकेट घेणारा आरपी सिंग पहिला गोलंदाज ठरला होता. 2010 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्यानंतर बळींचे शतक (IPL 2012) आणि दीड शतक (IPL 2017) झळकावणारा पहिला गोलंदाज लसिथ मलिंगा ठरला होता. एमआयकडून खेळताना त्याने हा विक्रम केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news