पॅरिस ऑलिम्पिक प्रवेश : दुबईतील पावसाचा भारतीय मल्लांना फटका | पुढारी

पॅरिस ऑलिम्पिक प्रवेश : दुबईतील पावसाचा भारतीय मल्लांना फटका

बिश्केक (किर्गिझस्तान) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकापासून थोडक्यात वंचित राहिलेला दीपक पुनिया, तसेच सुजित कलकल या भारतीय कुस्तीगिरांना पॅरिस ऑलिम्पिक प्रवेशाच्या पहिल्या संधीला मुकावे लागले. आशिया ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेला किर्गिझस्तानातील बिश्केकमध्ये शुक्रवारपासून सुरुवात झाली. यासाठी शुक्रवारी सर्व मल्लांची वजने घेण्यात आली. मात्र, वजनासाठी दोघेही भारतीय मल्ल वेळेत पोहोचू न शकल्यामुळे संयोजकांनी त्यांची प्रवेशिका अपात्र ठरवली.

रशियातील सराव संपवून दुबईमार्गे बिश्केकला पोहोचण्याच्या वाटेवर असणार्‍या या दोघांनाही दुबईत अडकून राहावे लागले. दुबईतील अतिमुसळधार पावसाने सर्व विमानसेवा ठप्प झाल्या होत्या. दीपक (86 किलो) आणि सुजित (65 किलो) हे दोघेही मंगळवारपासून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच अडकले होते. पावसामुळे विमानसेवा पूर्ववत होण्यास उशीर झाला. त्यामुळे दोघे शुक्रवारी सकाळी 8 वाजता बिश्केक येथे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, तोवर सहभागी मल्लांच्या वजनाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे संयोजकांनी त्यांना प्रवेश नाकारला. स्पर्धेत दीपकच्या जागी 57 किलो वजनी गटातून अमन सेहरावतने भारताचे प्रतिनिधित्व केले.

उशीर होण्याची कारणे दीपक आणि सुजित यांनी संयोजकांना सांगितली. मात्र, संयोजकांनी त्यांना सूट देण्यास नकार दिला. दीपक आणि सुजित यांना या स्पर्धेत खेळता आले नसले तरी आता त्यांच्यासह अन्य भारतीयांना पुढील महिन्यात होणार्‍या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून अखेरची संधी मिळणार आहे.

दीपक आणि सुजित त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षकांसह मंगळवारपासून दुबईत अडकले होते. शुष्क वाळवंट असलेल्या संयुक्त अरब अमिरातीत विक्रमी पाऊस झाला. दुबई विमानतळाच्या परिसरात पूरसद़ृश परिस्थिती झाली होती. त्यामुळे हे दोघे मंगळवारपासून तेथेच अडकले होते. त्यांना विमानतळावर फरशीवर झोपावे लागले. हे दोघे वैयक्तिक प्रवास करत होते. त्यांनी रशियातील दागेस्तान येथे 2 ते 15 एप्रिल या कालावधीत सराव केला. त्यानंतर दोघांनी 16 एप्रिल रोजी मकाचकाला येथून दुबईमार्गे बिश्केक असा विमानप्रवास सुरू केला. मात्र, दुबईतील अतिमुसळधार पावसाने सर्व विमानसेवा ठप्प झाल्या होत्या.

Back to top button