IPL 2024 : Glenn Maxwell : खराब फॉर्ममुळे ग्लेन मॅक्सवेलने घेतला अनिश्चित काळासाठी ‘ब्रेक’ | पुढारी

IPL 2024 : Glenn Maxwell : खराब फॉर्ममुळे ग्लेन मॅक्सवेलने घेतला अनिश्चित काळासाठी 'ब्रेक'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या इंडियन प्रीमीयर लीग ( IPL 2024 ) स्‍पर्धेत खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झालेल्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाला मोठा धक्‍का बसला आहे. या संघातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने यंदाच्‍या IPL हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आरसीबीच्या पराभव झाला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मॅक्सवेलने माध्‍यमांशी बोलताना ही माहिती दिली. ( IPL 2024 : Glenn Maxwell )

खराब फॉर्ममुळे मॅक्सवेलला या मोसमात खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्‍यात त्‍याला संघात स्‍थान देण्‍यात आले नव्‍हते. प्लेइंग-11 मध्ये त्याच्या जागी विल जॅक याने स्थान मिळवले. सामन्यानंतर मॅक्सवेलने स्पष्ट केले की, त्याने स्वतः कर्णधार फाफ डुप्लेसिस याला आपल्‍या ऐवजी अन्‍य खेळाडूला संधी देण्‍याची विनंती केली होती.

‘मानसिक आणि शारीरिक विश्रांतीसाठी घेतला ब्रेक’

पत्रकार परिषदेत बोलताना मॅक्सवेलने सांगितले की, सध्या त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे त्याने विश्रांतीच निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या सात सामन्यांतील सहाव्या पराभवानंतर मॅक्सवेल म्हणाला, “वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हा खूप सोपा निर्णय होता. शेवटच्या सामन्यानंतर मी फाफ (डु प्लेसिस) आणि प्रशिक्षकाकडे गेलो. त्‍यांना सांगितले की, माझ्‍या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी संघात स्‍थान देण्‍याची वेळ आली आहे. तुम्ही खेळत राहू शकता आणि स्वतःला आणखी अंधारात ढकलू शकता. तथापि, मला असे वाटते की आता खरोखरच माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्याची संधी आहे. मला स्पर्धेदरम्यान खेळण्याची गरज असेल, तर मला आशा आहे की मी मजबूत मानसिक आणि शारीरिक स्थितीत परत येईन आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्‍न करेन.

IPL 2024 : Glenn Maxwell : ‘संघासाठी योगदान देऊ शकलो नाही’

मॅक्सवेल म्हणाला की, “पॉवरप्लेनंतरच्‍या खेळीसाठी आमच्या फलंदाजीत थोडी कमतरता आहे. मला असे वाटू लागले आहे की, मी फलंदाजीतून संघासाठी सकारात्मक योगदान देऊ शकत नाही. त्यामुळेच निकाल आणि संघाची स्थिती चांगली नाही. यंदाच्‍या हंमागात गुणतालिकेत आम्ही तळाला आहोत. मला वाटते की इतर कोणाला तरी त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देण्याची ही चांगली वेळ आहे.

गावसकर यांनीही केली होती मॅक्सवेलवर टीका

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी देखील मॅक्सवेलच्या आयपीएलमधील खराब कामगिरीबद्दल टीका केली होती. त्‍यांनी म्‍हटलं होतं की, ‘तो वेगवान गोलंदाजी खेळू शकत नाही. तो त्याच्या कमरेच्या उंचीच्या खाली असलेल्या प्रत्येक चेंडूवर मारू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त चेंडू त्‍याला फटकवता येत नाहीत.

IPL 2024 : Glenn Maxwell : याआधीही केला आहे खराब फॉर्मचा सामना

मॅक्सवेलने या मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांत ५.३३ च्या सरासरीने आणि ९४.१२ च्या स्ट्राईक रेटने ३२ धावा केल्या आहेत. याआधी 2020 मध्येही तो खराब फॉर्ममधून गेला होता. त्यानंतर तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळायचा. त्यानंतर त्याने 11 डावात 15.42 च्या सरासरीने आणि 101.88 च्या स्ट्राईक रेटने केवळ 108 धावा केल्या. त्यावर्षी त्याने एकही षटकार मारला नाही. मॅक्सवेल 2015, 2016 आणि 2018 मध्ये खराब फॉर्ममध्ये गेला होता.

मागील काही वर्षात IPL मध्‍ये मॅक्‍सवेल ठरतोय अपयशी

मॅक्‍सवेल याने २०१८ च्‍या IPL हंगामात 12 सामन्यांमध्ये 14.08 च्या सरासरीने आणि 140.83 च्या स्ट्राईक रेटने 169 धावा केल्या होत्‍या. तर 2016 मध्ये त्याने 11 सामन्यात 19.88 च्या सरासरीने 179 धावा केल्या आणि 2015 मध्ये त्याने 1145 धावा केल्या. 13.18 च्या सरासरीने आणि 129.46 च्या स्ट्राइक रेटने सामने खेळले. आजवर त्‍याने आयपीएलमध्‍ये 130 सामने खेळले. यामध्‍ये 25.24 च्या सरासरीने आणि 156.40 च्या स्ट्राइक रेटने 2751 धावा केल्या आहेत. यामध्ये 18 अर्धशतकांचा समावेश आहे. मॅक्सवेलसाठी 2014 हा सर्वात शानदार हंगाम होता. त्याने 16 सामन्यात 187.75 च्या स्ट्राइक रेटने 34.50 च्या सरासरीने 552 धावा केल्या होत्‍या.

हेही वाचा :

Back to top button