LSG vs DC : दिल्लीने रोखला लखनौचा विजयरथ | पुढारी

LSG vs DC : दिल्लीने रोखला लखनौचा विजयरथ

लखनौ, वृत्तसंस्था : सलग तीन सामने जिंकून टॉप गिअरमध्ये असलेल्या लखनौ सुपर जायंटस्ला (LSG vs DC) पराभूत करण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आले. लखनौने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग करत दिल्लीने यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला. दिल्लीच्या संघाने 18.1 षटकांत 4 बाद 170 धावा केल्या. लखनौला आपल्या घरच्या मैदानावर दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला. पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि जॅक फ्रेजर-मॅकगर्क यांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दोन गुण मिळवले. प्रथमच दिल्लीने 160 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला पराभवाची धूळ चारली.

दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉने (32), डेव्हिड वॉर्नर (8), ऋषभ पंत (41), ट्रिस्टन स्टब्स (15* धावा) आणि शाई होपने नाबाद (11) धावा केल्या. जेक फ्रेजर-मॅकगर्कने निर्णायक खेळी केली. त्याने 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 35 चेंडूंत 55 धावा केल्या. यजमान लखनौकडून रवी बिष्णोईने सर्वाधिक (2) बळी घेतले, तर नवीन-उल-हक आणि यश ठाकूर यांना 1-1 बळी घेता आला. (LSG vs DC)

तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंटस्ने सावध सुरुवात करताना 6 षटकांत 2 बाद 57 धावा केल्या. डी कॉक 19 आणि देवदत्त पडिक्कल 3 धावांवर बाद झाल्यानंतर राहुलने डाव सावरला अन् संघाला अर्धशतक पार पोहोचवले; पण पॉवर प्लेमध्ये संपताच लखनौ सुपर जायंटस्ला कुलदीप यादवने वेसन घातली. त्याने आठव्या षटकात लखनौच्या मार्कस स्टोईनिस (8), निकोलस पूरन (0) या दोन धडाकेबाज फलंदाजांना बाद करत लखनौची अवस्था 2 बाद 66 धावांवरून 4 बाद 66 धावा अशी केली.

कुलदीपने लखनौला अजून एक तगडा झटका दिला. 39 धावांवर खेळणार्‍या के. एल. राहुलला बाद करत कुलदीपने आपली तिसरी शिकार केली. यानंतर इशांत शर्मा, मुकेश कुमार यांनी अजून दोन धक्के देत लखनौची अवस्था अजून वाईट केली.

लखनौची धावसंख्या 7 बाद 94 अशी झाली असताना आयुष बदोनीने झुंजार खेळी करत संघाला 18 व्या षटकात 150 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला अर्शद खानने तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. बदोनीने 35 चेंडूंत 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला अर्शद खानने नाबाद 20 धावा केल्या. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 73 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. या दोघांमुळे लखनौला 7 बाद 167 अशा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

लखनौ सुपर जायंटस् : 20 षटकांत 7 बाद 167. (के. एल. राहुल 39, आयुष बदोनी नाबाद 55. कुलदीप यादव 3/20.)
दिल्ली कॅपिटल्स : 18.1 षटकांत 4 बाद 170. (पृथ्वी शॉ 32, जेक फ्रेजर-मॅकगर्क 55, ऋषभ पंत 41. रवी बिष्णोई 2/25.)

Back to top button