IND vs NZ second Test : विराट आत, बाहेर कोण? | पुढारी

IND vs NZ second Test : विराट आत, बाहेर कोण?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कानपूर येथील भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना ‘ड्रॉ’ राहिला. आता सर्वांचे लक्ष मुंबई येथे 3 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्याकडे आहे. मुंबई कसोटीत (IND vs NZ second Test) भारतीय संघात विराट कोहली परत येणार आहे. त्यामुळे अंतिम संघ निवडताना संघ व्यवस्थापनाचा चांगलाच कस लागेल.

कानपूरमध्ये विराटच्या जागेवर श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती आणि त्याने आपल्या पहिल्याच कसोटीत चमकदार कामगिरी करीत (पहिल्या डावात 105 आणि दुसर्‍या डावात 65 धावा) 175 धावा केल्या. त्यामुळे दुसर्‍या कसोटीत त्याला संघाबाहेर ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे विराटसाठी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल यापैकी एकावर गंडातर येणार आहे.

पुजारा, रहाणेच्या फॉर्मबाबत चिंता (IND vs NZ second Test)

संघातील अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचा फॉर्म चांगला नाही. दोन्ही फलंदाजांना मोठी खेळी करून बराच काळ लोटला आहे. पुजाराने 40 डावांपूर्वी शतक झळकावले होते. तर, रहाणेनेदेखील 22 डावांपूर्वी शतकी खेळी केली होती. विदेशी खेळपट्टीवर अपयशी झाल्यानंतर दोघांकडून घरच्या मैदानावर चांगली खेळी करण्याची अपेक्षा होती.

मात्र, कानपूर कसोटीत पुजाराने सामन्यात एकूण 48 आणि रहाणेने 39 धावा केल्या. कोहली संघात आल्यास रहाणे बाहेर जाण्याची शक्यता अधिक आहे. 2013 मध्ये पदार्पण केल्यानंतर रहाणेची सरासरी ही पहिल्यांदाच 20 हून कमी आहे. इंग्लंड दौर्‍यावर देखील त्याला चमक दाखवता आली नव्हती.

यापूर्वी ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर रहाणेने शतक झळकावले होते. मात्र, उर्वरित सामन्यात त्याला हा फॉर्म कायम ठेवता आला नाही. दुसरीकडे पुजाराने ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर 8 डावांत 33.88 च्या सरासरीने 271 धावा केल्या तर, इंग्लंड दौर्‍यात त्याने 227 धावा केल्या.

पुजारा-रहाणेला मिळू शकते संधी (IND vs NZ second Test)

मुंबई कसोटीत खराब फॉर्म आणि कोहली संघात आला तरीही दोघांनाही अंतिम एकादशमध्ये स्थान मिळू शकते. याचे कारण म्हणजे दोघांचा अनुभव व मयंक अग्रवालचा खराब फॉर्म. कानपूर कसोटीत रोहित शर्मा आणि के. एल. राहुल नसल्याने मयंकला संधी मिळाली होती. त्याने दोन्ही डावांत 30 धावांच केल्या. मयंकने 10 डाव अगोदर अर्धशतकी खेळी केली होती आणि खराब फॉर्ममुळेच त्याला बाहेर करण्यात आले होते.

के. एस. भरतदेखील संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत

मयंक अग्रवाल मुंबई कसोटीत संघाबाहेर झाल्यास त्याच्या जागी युवा यष्टिरक्षक के. एस. भरतला सलामीला संधी मिळू शकते. स्थानिक क्रिकेटमध्ये भरत हा सलामी करतो. तसेच, कानपूरमध्ये त्याने आपल्या यष्टिरक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे भरतला मयंकच्या जागी संधी मिळू शकते.

तसेच, साहाच्या जागी विराट संघात आल्यास पुजारा आणि रहाणे दोघेही अंतिम एकादशमध्ये राहू शकतात. साहा कानपूर कसोटीत अनफिट दिसत होता. तो पहिल्या आणि दुसर्‍या डावांत यष्टिरक्षणाला देखील आला नव्हता. त्यामुळे साहा बाहेर गेल्यास भरत ती जबाबदारी सांभाळू शकतो.

Back to top button