Marais Erasmus : ‘माझ्या चुकीमुळे इंग्लंडने विश्वचषक जिंकला’, निवृत्त पंच इरास्मस यांचा गौप्यस्फोट

Marais Erasmus : ‘माझ्या चुकीमुळे इंग्लंडने विश्वचषक जिंकला’, निवृत्त पंच इरास्मस यांचा गौप्यस्फोट

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्लंडला 2019 चा वनडे विश्वचषक जिंकता आला. त्या चुकीचा मला खेद आहे, असा गौप्यस्फोट द. आफ्रिकेचे पंच माराईस इरास्मस (Marais Erasmus) यांनी केला. निवृत्तीनंतर मुलाखतीत त्यांनी ही भावना व्यक्त केली.

इरास्मस (Marais Erasmus) यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली. 8 ते 11 मार्च या कालावधीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात ते शेवटचे अंपायरिंगसाठी मैदानात दिसले. निवृत्तीनंतर त्यांनी नुकतीच एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या अंपायरिंग कारकिर्दीत केलेल्या दोन सर्वात मोठ्या चुकांबद्दल खेद व्यक्त केला.

इरास्मस (Marais Erasmus) म्हणाले, 2019 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मी कधीच विसरू शकणार नाही. इंग्लंडला तीन चेंडूत नऊ धावांची गरज होती. पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्सने मोठा फटका खेळला. त्याने नॉन स्ट्रायकर आदिल रशीदसह पहिली धाव आरामात पूर्ण केली. त्यानंतर दुसरी घेण्यासाठी दोघे सरसावले. न्यूझीलंडच्या फिल्डरने विकेटकिपर एंडला थ्रो केला. त्याचवेळी धावबाद होण्यापासून वाचवण्यासाठी स्टोक्स क्रिजच्या दिशेने झेपावला. पण चेंडू विकेटकिपरच्या हातात जाण्याआधी स्टोक्सच्या बॅटला लागला आणि सीमारेषा पार गेला. त्यानंतर दुसरे मैदानी पंच कुमार धर्मसेनाने आणि माझ्यात चर्चा झाली. आम्ही दोघांनी तिसरे पंच यांच्याशीही संवाद साधला. तिघांमधील चर्चेअंती इंग्लंडला 6 धावा दिल्या गेल्या. पण नंतर कळले की त्या 5 धावा असायला हव्या होत्या, कारण जेव्हा थ्रो झाला तेव्हा फलंदाजांकडून दुसरी धाव पूर्ण झाली नव्हती.'

5 च्या ऐवजी 6 धावा देण्याची चूक

'या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडलो तेंव्हा कॉरिडोरमध्ये कुमार धर्मसेना भेटले, ते मला म्हणाले की कालच्या सामन्यात आपण खूप मोठी चूक केली हे तुला माहीत आहे का? तेव्हा मला कळले की जेव्हा चेंडू फेकला गेला तेव्हा रशीद आणि स्टोक्सने क्रिज गाठलेले नव्हते. ज्यामुळे 5 धावा देणे गरजेचे होते. पण आमच्याकडून 6 धावा देण्यात आल्या. आमच्याकडून मोठी चूक झाल्याची त्यावेळी जाणीव झाली. दुर्दैवाने ही घटना कधीही विसरता येणार नाही,'

रॉस टेलरला चुकीचे बाद दिल्याचा पश्चाताप

'न्यूझीलंडच्या रॉस टेलरला चुकीच्या पद्धतीने एलबीडब्ल्यू बाद दिल्याबद्दलही मला पश्चाताप झाला. चेंडू टेलरच्या पॅडवर आदळलल्यानंतर इंग्लिश खेळाडूंनी जोरदार अपील केले. मीही झपट निर्णय घेत टेलरला बाद घोषीत केले. पण नंतर समजले की चेंडू पॅडच्या वरच्या भागावर आदळला होता. मी बाद दिल्यानंतर टेलरला मैदान सोडावे लागले कारण त्यांचे रिव्ह्यू संपले होते. सात आठवड्यांच्या स्पर्धेत ही माझी पहिली चूक ठरली होती. ज्यामुळे मी खूप निराश झालो. कारण माझ्याकडून कोणतीही चूक झाली नसती, तर निकाल पूर्णपणे वेगळा लागला असता. साहजिकच टेलरला बाद दिल्याने सामन्यावर परिणाम झाला,' असा खुलासाही इरास्मस यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news