DC vs RR : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय; दिल्ली कॅपिटल्स 12 धावांनी पराभूत | पुढारी

DC vs RR : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय; दिल्ली कॅपिटल्स 12 धावांनी पराभूत

जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने चांगला दम दाखवला. मात्र, राजस्थानने सामना 12 धावांनी जिंकून यंदाच्या हंगामात होम ग्राऊंडवर विजय मिळवण्याचा सिलसिला कायम ठेवला. दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्सने 23 चेंडूंत 44 धावा केल्या; पण शेवटच्या षटकांत 17 धावा करण्याचे आव्हान आवेश खानने स्टब्स आणि अक्षर पटेलला पूर्ण करू दिले नाही. त्यामुळे दिल्लीला सलग दुसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. (DC vs RR)

‘आयपीएल’च्या 9 व्या सामन्यात गुरुवारी राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेमध्येच दोन फलंदाज गमावले. नांद्रे बर्जरने मिचेल मार्शची खेळी 23 धावांवर संपुष्टात आणली. त्यानंतर बर्जरने रिकी भुईलादेखील शुन्यावर माघारी धाडले. (DC vs RR)

आवेश खानने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 49 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. दिल्लीची अवस्था 11.2 षटकांत 3 बाद 97 धावा अशी केली. यावेळी आवश्यक धावगती चेंडूमागे दोनवर गेली असताना सर्व अपेक्षा कर्णधार ऋषभ पंतवर होत्या. परंतु, युझवेंद्र चहलने 26 चेंडूंत 28 धावा करणार्‍या ऋषभ पंतला बाद करत दिल्लीला एक मोठा धक्का दिला. अश्विन टाकत असलेल्या 17 व्या षटकात ट्रेंट बोल्टने ट्रिस्टन स्टब्सचा एक साधा झेल सोडला. त्यानंतर स्टब्सने अश्विनच्या या षटकात 19 धावा चोपून सामन्यात ट्विस्ट निर्माण केला; पण शेवटच्या षटकांत 17 धावांचे रक्षण करण्यात आवेश खान यशस्वी ठरला. दिल्लीने 5 बाद 173 धावांपर्यंत मजल मारली.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 185 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल (5), जोस बटलर (11) स्वस्तात परतल्यामुळे यजमान संघावर दबाव आला. मग राजस्थानच्या संघाने संथ गतीने धावा करत पॉवरप्ले संपवला.

कर्णधार संजू सॅमसनला (15) देखील काही खास करता आले नाही; पण मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या रियान परागने मैदान गाजवले. त्याने अर्धशतकी खेळी करून घरच्या चाहत्यांना जागे केले. परागने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 45 चेंडूंत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा कुटल्या. परागने एनरिक नॉर्तजेची चांगलीच धुलाई केली. दिल्लीकडून अखेरचे षटक घेऊन आलेल्या नॉर्तजेच्या या षटकात परागने 25 धावा खेचल्या. त्याने 4,4,6,4,6 आणि अखेरच्या चेंडूवर 1 धाव काढली. त्याला आर. अश्विन (29), ध्रुव ज्युरेल (20) आणि शिमरोम हेटमायरने नाबाद 14 यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला. राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 185 धावा केल्या.

हेही वाचा : 

Back to top button