R Ashwin Number 1 Bowler : आर अश्विन नंबर 1 कसोटी गोलंदाज! बुमराहला टाकले मागे | पुढारी

R Ashwin Number 1 Bowler : आर अश्विन नंबर 1 कसोटी गोलंदाज! बुमराहला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Number 1 Bowler : भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा सहाव्यांदा कसोटी क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज बनला आहे. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकत आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला. तर फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाच तर यशस्वीने दोन स्थानांची झेप घेतली आहे. कुलदीप यादवलाही क्रमवारीत चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे.

​​870 रेटिंग मिळवून अव्वल स्थानावर

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 37 वर्षीय अश्विनने सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या. मालिकेतील शेवटचा धर्मशाला येथील कसोटी सामना त्याच्यासाठी खास ठरला. हा त्याच्या करियरमधील 100 वा कसोटी सामना होता, ज्यात टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून देण्यात अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच फलंदाजांची शिकार केली. यासह त्याने दोन्ही डावांत 128 धावांत नऊ बळी घेतले. या कामगिरीचा फायदा अश्विनला झाला आणि तो ​​870 रेटिंग मिळवून आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचला. डिसेंबर 2015 मध्ये तो पहिल्यांदा कसोटीतील अव्वल गोलंदाज बनला होता.

बुमराहला दोन स्थानांचे नुकसान

जसप्रीत बुमराहला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर आहे. तर रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा पहिल्या तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.

कुलदीप यादवने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत सात बळी घेतले. तो सामनावीर ठरला. ज्यामुळे तो आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत 15 स्थानांनी झेप घेत 16व्या स्थानावर पोहोचला. अशाप्रकारे टॉप-20 कसोटी गोलंदाजांमध्ये भारताच्या चार गोलंदाजांचा समावेश आहे. किवी संघाचा मॅट हेन्रीने सहा स्थानांची प्रगती केली आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम 12वे स्थान गाठले आहे.

रोहितचा दबदबा

रोहित शर्माने कसोटी फलंदाजी क्रमवारीत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला 5 स्थानांचा फायदा झाला आहे. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या 9 कसोटी डावांमध्ये 400 धावा केल्या. तो मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर राहिला.

यशस्वी आठव्या स्थानी

यशस्वी जैस्वालने कसोटी फलंदाजी क्रमवारीत प्रगती केली आहे. 10 वरून 8 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या 9 डावात 712 धावा केल्या. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन द्विशतकेही आणि तीन अर्धशतके झळकली.

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत केन विल्यमसन अव्वल, तर जो रूट दुसऱ्या स्थानावर कायम आहे. बाबर आझमला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यानंतर डॅरेल मिशेल आणि स्टीव्ह स्मिथचा क्रमांक लागतो.

Back to top button