Rahane-Pujara : पुढच्या कसोटीतून रहाणे-पुजाराला डच्चू मिळण्याची शक्यता | पुढारी

Rahane-Pujara : पुढच्या कसोटीतून रहाणे-पुजाराला डच्चू मिळण्याची शक्यता

कानपूर; पुढारी ऑनलाईन : Rahane-Pujara IND vs NZ Kanpur Test : न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे भारतीय फलंदाज फ्लॉप झाले. अशा स्थितीत दोघांनाही पुढील सामन्यातून डच्चू मिळू शकतो, असे मानले जात आहे. कारण भारतीय कर्णधार विराट कोहली पुढील कसोटीतून (३ डिसेंबर-७ डिसेंबर) पुनरागमन करणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणेने कानपूर कसोटीत संघाचे नेतृत्व करत आहे.

कानपूर कसोटीच्या दोन्ही डावात अजिंक्य रहाणेला एकही अर्धशतक झळकवता आले नाही. तर दोन्ही डावात मिळूनही त्याच्या ५० धावाही झाल्या नाहीत. पहिल्या डावात त्याने ३५ तर दुसऱ्या डावात केवळ ४ धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराची अवस्थाही अशीच आहे. त्यालाही दोन्ही डावात मोठी खेळी करता आली नाही. त्याने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात २६ आणि दुसऱ्या डावात २२ धावा केल्या.

रहाणेने या खेळीपूर्वी २० डावात केवळ ४०७ धावा केल्या होत्या. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याची सरासरीही २०.३ होती. रहाणेने डिसेंबर २०२० मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११२ धावांची खेळी साकारली होती.

पुजारा-रहाणे दोघांना डच्चू?

दुसऱ्या कसोटीत कोहलीचे आगमन निश्चित आहे. अशा स्थितीत रहाणे किंवा पुजाराला विश्रांती दिली जाऊ शकते, कारण कानपूर कसोटीत पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने शतक झळकावून आपले स्थान पक्के केले आहे. त्याचवेळी शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल सलामीला राहतील. रहाणे आणि पुजारा हे दोघेही वगळले तर यष्टिरक्षक फलंदाज श्रीकर भरत किंवा सूर्यकुमार यादव यांना पदार्पणाची संधी मिळू शकते.

असेच काहीसे चेतेश्वर पुजाराच्या बाबतीत घडले. पुजाराने जानेवारी २०१९ मध्ये शेवटचे कसोटी शतक झळकावले. गेल्या २३ कसोटी आणि ३९ डावांत तो तिहेरी आकडा गाठू शकलेला नाही. यादरम्यान त्याची सरासरी २८.७८ इतकी आहे. पुजाराने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ८८ चेंडू खेळून अवघ्या २६ धावा केल्या. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात पुजाराला मोठी खेळी खेळण्याची संधी मिळाली होती, पण इथेही तो त्याचा फायदा उठवू शकला नाही. चेतेश्वर पुजाराला गेल्या ४ वर्षांपासून मायदेशातील कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये नागपुरात श्रीलंकेविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. तेव्हापासून, पुजाराने एकूण ६८ कसोटी डाव खेळले आहेत. यादरम्यान त्याने परदेशी भूमीवर ४ शतके झळकावली, पण मायदेशात त्याच्या बॅटला शतकी खेळीचा दुष्काळ सहन करावा लागत आहे.

Back to top button