Team India ICC Rankings : भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत ‘किंग’! तिन्ही फॉरमॅटमध्ये बनला नंबर-1 | पुढारी

Team India ICC Rankings : भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत ‘किंग’! तिन्ही फॉरमॅटमध्ये बनला नंबर-1

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी क्रिकेटमधील संघांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 असा विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन संघ बनला आहे. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही पहिल्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची किमया केली आहे.

आयसीसीच्या ताज्या अपडेटमध्ये टीम इंडियाचे 4636 पॉइंट्स आणि 122 रेटिंग आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे रेटिंग 117 आहे. तर इंग्लंड 111 रेटिंगसह तिसऱ्या आणि न्यूझीलंड 101 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकली तरी त्यांना पुन्हा पहिला क्रमांक मिळवता येणार नाही.

भारतीय संघ अव्वल स्थानी (Team India ICC Rankings)

भारताने इंग्लंडला मायदेशात भुईसपाट केले. रोहित सेनेने पहिली कसोटी गमावल्यानंतर पुढील चारही सामने जिंकून 4-1 मालिकेवर कब्जा केला. या विजयाचा भारतीय संघाला आयसीसी क्रमवारीत चांगलाच फायदा झाला. यासह टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाशिवाय टॉप-10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही.

भारतीय संघ आधीच आयसीसी वनडे आणि टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. वनडेच्या यादीत टीम इंडियाचे 121 रेटिंग गुण तर टी-20 च्या यादीत 266 गुण आहेत. अशाप्रकारे टीम इंडिया आता आयसीसी क्रमवारीतील तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनली आहे.

युवा खेळाडूंनी आपली ताकद दाखवून दिली

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने या मालिकेत सर्वाधिक 712 धावा केल्या. या मालिकेत त्याने दोन द्विशतके झळकावली. याशिवाय त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतकेही झळकली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. तर शुभमन गिलने या मालिकेत 452 धावा केल्या. याशिवाय मालिकेत पदार्पण केलेल्या सरफराज खान आणि देवदत्त पडिकल यांनीही चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, गोलंदाजीत कुलदीप यादवने 19 विकेट्स घेतल्या. तर आकाश दीपने पहिल्याच कसोटी सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाला मालिका 4-1 ने जिंकण्यात यश आले. (Team India ICC Rankings)

Back to top button