KL Rahul : के. एल. राहुलला नक्की झालंय काय? IPL, T20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह | पुढारी

KL Rahul : के. एल. राहुलला नक्की झालंय काय? IPL, T20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या लोकेश राहुलला (KL Rahul) माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर त्याला उर्वरित मालिकेला मुकावे लागले. तिसर्‍या कसोटीत लोकेश राहुलची संघात निवड झाली होती. परंतु 90 टक्के फिट असलेल्या अंतिम 11 मध्ये संधी दिली गेली नाही. तो त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल झाला. चौथ्या किंवा पाचव्या कसोटीतून तो पुनरागमन करेल, अशी शक्यता होती. पण, पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर झाला. त्यातून लोकेशचे नाव वगळले गेले. त्यानंतर आता तो आयपीएल 2024 व टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत तरी खेळेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकेशच्या (KL Rahul) दुखापतीचे कारण बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमला कळत नसल्याने तो लंडनमध्ये गेला. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि तो आता भारतात परतला आहे. तो आता बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुढील उपचार घेणार आहे. त्याने लंडनमधील उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. तो रविवारी भारतात परतला आणि पुनर्वसनासाठी त्याने बंगळूरमधील बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तपासणी केली.

त्याला एनसीएकडून लवकरच रिटर्न टू प्ले प्रमाणपत्र मिळायला हवे. आयपीएलमध्ये तो त्याची योग्यता सिद्ध करण्यास उत्सुक आहे आणि भारताच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडीसाठी शर्यतीत आहे, असे एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. (KL Rahul)

Back to top button