Ranji Trophy 2024 : मुंबईची विक्रमी 48व्यांदा रणजी ट्रॉफी फायनलमध्ये धडक! | पुढारी

Ranji Trophy 2024 : मुंबईची विक्रमी 48व्यांदा रणजी ट्रॉफी फायनलमध्ये धडक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy 2024 : मुंबईने तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव करत रणजी ट्रॉफी 2024 च्या फायनमध्ये विक्रमी 48 व्यांदा धडक मारली आहे. शार्दुल ठाकूरने उपांत्य फेरीत चमकदार अष्टपैलू कामगिरी केली. 109 धावा करण्यासोबतच त्याने दोन्ही डावात प्रत्येकी दोन-दोन अशा एकूण 4 विकेट्सही घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अंतिम सामन्यात मुंबईची लढत विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा फायनल मुकाबला 10 मार्च ते 14 मार्च दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना कसा झाला? (Ranji Trophy 2024)

तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. खेळपट्टी गोलंदाजांना खूप मदत करत होती, त्यामुळे तामिळनाडूच्या प्रथम फलंदाजीच्या निर्णयाबाबत बरेच वाद झाले. या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी तामिळनाडूचा कर्णधार साई किशोरवर जोरदार टीका केली. पहिल्या डावात तामिळनाडूचा संघ अवघ्या 146 धावांत गारद झाला. विजय शंकरने 44 धावांची तर वॉशिंग्टन सुंदरने 43 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय तामिळनाडूच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला पहिल्या डावात 20 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. एम मोहम्मदने 17 आणि एस अजित रामने 15 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून तुषार देशपांडेने तीन, तर शार्दुल, मुशीर खान आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहित अवस्थीला 1 बळी मिळाला.

मुंबईचीही सुरुवात खराब

प्रत्युत्तरात मुंबईचीही सुरुवात खराब झाली. त्यांचे अव्वल फलंदाज श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, कर्णधार अजिंक्य रहाणे हे फेल झाले. त्यांची अवस्था सात विकेट्सवर 106 धावा झाली होती. त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या (109) शतकी, तनुष कोटियनच्या (89) आणि मुशीर खानच्या (55) अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 378 धावा केल्या. हार्दिक तामोरेने उपयुक्त 35 धावांचे योगदान दिले. तामिळनाडूकडून कर्णधार साई किशोरने सर्वाधिक 6 बळी घेतले. तसेच कुलदीप सेनने 2 आणि संदीप वॉरियर-वॉशिंग्टनने 1-1 बळी घेतले. पहिल्या डावाच्या जोरावर मुंबईला 232 धावांची आघाडी मिळाली.

तामिळनाडूचा दुसरा डाव 162 धावांत गारद (Ranji Trophy 2024)

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेला तामिळनाडूचा संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि 162 धावांतच गारद झाला. बाबा इंद्रजीतने सर्वाधिक 70 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष योगदान देता आले नाही. मुंबईकडून शम्स मुलानीने 4 बळी घेतले. याशिवाय शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

मुंबईने इतिहास घडवला

मुंबई हा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिला संघ आहे ज्याच्या खेळाडूंनी मालिकेत 9, 10 आणि 11 व्या स्थानावर शतके ठोकली आहेत. 10व्या क्रमांकावर असलेल्या तुषारने 123 आणि तनुषने 120 धावा केल्या. शार्दुलने 9व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 109 धावा केल्या. (Ranji Trophy 2024)

मुंबईच्या नावावर 41 रणजी ट्रॉफी

मुंबई संघाने 48व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 10 पेक्षा जास्त वेळा प्रथम श्रेणी ट्रॉफी जिंकणारा हा एकमेव संघ आहे. मुंबईच्या नावावर विक्रमी 41 रणजी ट्रॉफीचे जेतेपदे आहेत. तर हा संघ सहा वेळा उपविजेता ठरला आहे. या संघाने 2016 मध्ये अखेरचे विजेतेपद पटकावले होते. रणजी करंडक विजेतेपदांच्या बाबतीत, कर्नाटक क्रिकेट संघ 8 ट्रॉफीसह मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Back to top button