Reliance-Disney : तब्बल 70,352 कोटींचा व्यवहार! | पुढारी

Reliance-Disney : तब्बल 70,352 कोटींचा व्यवहार!

मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटवर भविष्यात मोठा परिणाम करणारी एक डील नुकतीच झाली आहे. रिलायन्स आणि डिस्ने इंडियाचे विलीनीकरण झाले आहे. याचा भारतातील क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना सर्व मोठ्या क्रिकेट स्पर्धा एकाच प्लॅटफॉर्मवर पाहावयास मिळणार आहेत. तो प्लॅटफॉर्म म्हणजे, जिओ सिनेमा! रिलायन्स इंडस्ट्रिज आणि डिस्ने स्टार इंडियाचे (Reliance-Disney) विलीनीकरण मूल्य हे जवळपास 70,352 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या विलीनीकरणाचा थेट परिणाम हा भारतातील क्रिकेट चाहत्यांवर होणार आहे.

या विलीनीकरणाच्या रणनीतीमुळे ज्या पद्धतीने भारतातील चाहते क्रिकेट पाहत होते ती पद्धतच बदलून जाणार आहे. यात पारंपरिक टीव्ही प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रिमिंग यांचादेखील समावेश आहे. क्रिकेटसाठी आता जिओ हा सर्वात प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे.

रिलायन्स डिजिटलचा जिओ सिनेमा हा प्लॅटफॉर्म भारतातील क्रिकेट स्पर्धांचे स्ट्रिमिंग करणारा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. यात आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि ‘आयसीसी’च्या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे, तर स्टार स्पोर्टस् हे भारतातील क्रिकेट सामने टेलिकास्ट करणारे प्रमुख चॅनेल होईल.

रिलायन्स आणि डिस्नेच्या विलीनीकरणाला नुकतेच मूर्तरूप आल्यामुळे डिस्ने हॉटस्टारच्या भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ शकतो. त्यांच्याकडे सध्या आयसीसी ब्रॉडकास्टिंग हक्क आहेत. हे हक्क भारतात तरी जिओ सिनेमाकडे जातील.

याचबरोबर स्पोर्टस् 18 आणि रिलायन्सचे इतर स्पोर्टस् चॅनलदेखील भारतीय क्रिकेट ब्रॉडकास्टिंग जगतातील मोठे प्लेअर बनू शकतात. भारताच्या द्विपक्षीय मालिका आणि महिला प्रीमियर लीग हे स्टार स्पोर्टस्वरच पाहिले जाऊ शकते.

नियमांचा येऊ शकतो अडथळा (Reliance-Disney)

रिलायन्स आणि डिस्ने विलीनीकरणाचा करार झाल्याचे 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले. मात्र, आता या प्रक्रियेला ‘कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडिया’ आणि कायदेशीर संस्थांचीदेखील परवानगी मिळणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला जवळपास 10 ते 12 महिने लागू शकतात. त्यामुळे आयपीएल 2024 आणि जूनमध्ये होणार्‍या टी-20 वर्ल्डकपवर मात्र या विलीनीकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. या दोन स्पर्धा स्टार स्पोर्टस् आणि हॉटस्टारवरूनच प्रक्षेपित होणार आहेत. मात्र, या विलीनीकरणामुळे जिओ सिनेमाला चॅम्पियन्स ट्रॉफी प्रक्षेपित करण्याची संधी मिळणार आहे.

याचबरोबर महिला प्रीमियर लीग जिओवर आणि महिलांचे सामने स्टार स्पोर्टस्वर प्रक्षेपित केले जाऊ शकतात. या नव्या प्लॅटफॉर्मचे नाव जिओ स्टार स्पोर्टस् असेदेखील असू शकते.

Back to top button