Cricket Match Fixing : बंगाल क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे वारे? | पुढारी

Cricket Match Fixing : बंगाल क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे वारे?

कोलकाता, वृत्तसंस्था : ‘आयपीएल’मध्ये खेळलेला विकेटकीपर-फलंदाज श्रीवत्स गोस्वामीने कोलकाता लीग क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा मोठा दावा केला आहे. ज्याप्रकारे काही खेळाडू बाद झाले, त्यावरून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) फर्स्ट डिव्हिजन लीगमधील एक सामना फिक्स झाल्याचे दिसत आहे. हे सर्व पाहून मन दुखावल्याचे गोस्वामीने सांगितले. गोस्वामी ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.

गोस्वामीने फेसबुकवर लिहिले, ‘कोलकाता क्लब क्रिकेटमधील हा सुपर डिव्हिजन सामना आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये उजव्या हाताचा फलंदाज बॉल सरळ स्टंपवर सोडताना आणि नंतर अचानक मैदानाबाहेर जाताना दिसत आहे. दुसर्‍या व्हिडीओमध्ये डावखुरा फलंदाज स्टंप आऊट होण्यासाठी वाईड बॉलवर क्रीजमधून बाहेर येतो.’

सॉल्ट लेक येथे बुधवारी तीन दिवसीय सामना टाऊन क्लबने सात गुणांसह संपवला. या सामन्यात शाकिब हबीब गांधीच्या 223 धावांनी टाऊन क्लबला 446 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात जॉयजित बसूच्या 100 धावांच्या जोरावर मोहम्मडन स्पोर्टिंगने 281/9 धावा केल्या. बसू आऊट झाल्यानंतर मोहम्मडन स्पोर्टिंग संघ लगेच कोलमडला.

‘सीएबी’ने मागितला अहवाल

‘पीटीआय’च्या या वृत्तानुसार देबब्रत दास यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ‘सीएबी’चे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली म्हणाले की, त्यांनी पंच, निरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. स्नेहाशिष हे सौरव गांगुलीचे मोठे बंधू आहेत.

Back to top button