NZ vs AUS 1st Test : वेलिंग्टन कसोटीत ग्रीन-हेजलवूड चमकले! ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंडविरुद्ध वर्चस्व

NZ vs AUS 1st Test : वेलिंग्टन कसोटीत ग्रीन-हेजलवूड चमकले! ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंडविरुद्ध वर्चस्व
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 383 धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ 179 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 13 धावा केल्या असून संघाची आघाडी 217 धावांवर पोहोचली आहे. उस्मान ख्वाजा (5*) आणि नॅथन लियॉन (6*) सध्या नाबाद आहेत.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 9 बाद 279 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. कॅमेरॉन ग्रीन (174*) आणि जोश हेझलवूड (22) यांनी शेवटच्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली. मॅट हेन्रीने जोश हेझलवूडला रचिन रवींद्रकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपवला. ग्रीनने 275 चेंडूत 23 चौकार आणि 5 षटकार ठोकले. किवींना कांगारूंची शेवटची विकेट घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. ग्रीन आणि हेजलवूड यांची ऑस्ट्रेलियन कसोटी इतिहासात 10व्या विकेटसाठी चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यांनी 2004 मध्ये ग्लेन मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पी यांनी केलेल्या 114 धावांच्या भागिदारीचा विक्रम मागे टाकला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 5 बळी घेतले. विल्यम ओ'रुर्के आणि स्कॉट कुझेलगिनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. एक विकेट रचिन रवींद्रच्या खात्यात आली.

विल्यमसन कसोटीत तिसऱ्यांदा धावबाद

न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. मिचेल स्टार्कने पाचव्या षटकात टॉम लॅथमला (5) क्लीन बोल्ड केले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केन विल्यमसन दुर्दैवाने धावबाद झाला. विल्यमसनला खातेही उघडता आले नाही. स्टार्कविरुद्ध मिड ऑफला शॉट खेळल्यानंतर विल्यमसनने धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. पण पुढे जाऊन तो विल यंगला धडकला. त्याचवेळी मिड ऑफला क्षेत्ररक्षण करणाऱ्या लॅबुशेनने नॉन-स्ट्राइक एंडच्या दिशेने फेकलेला चेंडू थेट स्टंपवर आदळला. याचबरोबर विल्यमसन धावबाद झाला. विल्यमसन 12 वर्षांनंतर कसोटीत धावबाद झाला. शेवटच्यावेळी तो जानेवारी 2021 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झाला होता. कसोटीत तो तिसऱ्यांदा धावबाद झाला आहे.

नॅथन लायनच्या चार विकेट

जोश हेझलवूडने रचिन रवींद्रला बाद करून न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. रवींद्रला खातेही उघडता आले नाही. नॅथन लायने त्याचा झेल पकडला. न्यूझीलंडने केवळ 29 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. ग्लेन फिलिप्स (71) आणि मॅट हेन्री (42) यांनी काही प्रमाणात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना केला, पण इतर फलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडचा डाव 43.1 षटकांत 179 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जोश हेझलवूडला दोन बळी मिळाले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.

दुस-या डावात कांगारूंना दोन मोठे धक्के

न्यूझीलंडला स्वस्तात बाद गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर किवी कर्णधार टीम साऊदीने स्टीव्ह स्मिथला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर त्याने पाचव्या षटकात मार्नस लॅबुशेन (2)ला टॉम ब्लंडेलकडे झेलबाद केले. सामन्याच्या तिस-या दिवशी यजमान न्यूझीलंड पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटपट तंबूत पाठण्याचा प्रयत्न करेल. पण सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया कसोटी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

वॉल्शचा विक्रम मोडला

लायनने वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शचा विक्रम मोडला. वॉल्शने 2001 मध्ये 519 विकेट घेतल्या होत्या. लायनने या सामन्यात तीन विकेट घेताच त्याने वॉल्शला मागे टाकले. आता त्याच्या नावावर 521 विकेट्स जमा झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 3 गोलंदाज

शेन वॉर्न : 708
ग्लेन मॅकग्रा : 563
नॅथन लियॉन : 521

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news