Sourav Ganguly : इशान, श्रेयसवरील कारवाई योग्यच : सौरभ गांगुली | पुढारी

Sourav Ganguly : इशान, श्रेयसवरील कारवाई योग्यच : सौरभ गांगुली

कोलकाता, वृत्तसंस्था : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळण्याचा ‘बीसीसीआय’चा निर्णय योग्य आहे, असे मत माजी कर्णधार आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली याने म्हटले आहे. ‘बीसीसीआय’ने अय्यर आणि किशन यांना वार्षिक करारातून वगळले आणि हा खूप मोठा निर्णय आहे. हे दोघेही गेल्या वर्षी भारतात झालेल्या वन-डे वर्ल्डकप मोहिमेत सहभागी झाले होते. किशन नोव्हेंबर 2023 मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला, तर अय्यर विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत भारतीय संघाचा सदस्य होता. (Sourav Ganguly)

गांगुली म्हणाला की, किशन आणि अय्यरबाबत ‘बीसीसीआय’चा निर्णय योग्य होता. करारबद्ध खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटही खेळणे अपेक्षित आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे, अशी ‘बीसीसीआय’ची इच्छा आहे. श्रेयस आणि इशान रणजी करंडकसारख्या प्रमुख स्पर्धेत खेळले नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते. खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेच पाहिजे. (Sourav Ganguly)

‘हे दोघे चुकले आहेत. तुम्हाला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे आहे. एकदा तुम्ही करारबद्ध खेळाडू झालात की, तुमच्याकडून खेळणे अपेक्षित असते. श्रेयस अय्यर काही दिवसांत उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळणार आहे,’ असे गांगुली पुढे म्हणाला.

तो पुढे म्हणाला, ‘किशनने दक्षिण आफ्रिकेचा दौरा मध्यावर सोडला आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो खेळला नाही. त्याच्या वागण्याचे मला आश्चर्य वाटले. भारतीय संघाच्या सर्व फॉरमॅटच्या संघाचे ते सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे ‘आयपीएल’मध्ये मोठे करारही आहे, असे असूनही इशान का खेळला नाही, याचे मला आश्चर्य वाटते.’

‘बीसीसीआय’ने कठोर भूमिका घेतली आहे आणि ती योग्यच आहे. जेव्हा तुमच्याशी करार केला जातो तेव्हा तुम्हाला नियमांचे पालन करावे लागते, असेही गांगुली पुढे म्हणाला. (Sourav Ganguly)

रोहित शर्मा जबरदस्त कर्णधार

भारताचा माजी कर्णधार आणि ‘बीसीसीआय’चा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने भारताचा कर्णधार रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले आहे. गांगुली ‘बीसीसीआय’ अध्यक्ष असतानाच रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आले होते. त्याच्यात ती क्षमता होती म्हणून आम्ही त्याला कर्णधार केले आणि आमचा निर्णय योग्य होता, हे त्याने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे, असे गांगुली म्हणाला. रोहित शर्माकडे डिसेंबर 2021 मध्ये भारतीय वन-डे आणि टी-20 संघांचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरातच त्याच्याकडे कसोटी संघाचेदेखील कर्णधारपद सोपवण्यात आले.गांगुली म्हणाला, ‘रोहित शर्मा हा एक जबरदस्त कर्णधार आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये कशाप्रकारे नेतृत्व केले हे आपण पाहिले आहे. मला वाटते की, भारतीय संघ फायनल हरण्यापूर्वी स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. त्याच्या नावावर अनेक आयपीएल टायटल आहेत.

Back to top button