WTC Points Table Update : रांची कसोटी जिंकल्यानंतर भारताला डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलमध्ये फायदा, जाणून घ्या समीकरण | पुढारी

WTC Points Table Update : रांची कसोटी जिंकल्यानंतर भारताला डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलमध्ये फायदा, जाणून घ्या समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Points Table Update : रांची कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (2023-25) आपले स्थान मजबूत केले आहे. भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर असून अंतिम फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा वाढल्या आहेत.

दरम्यान, या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या गुणतालिकेत महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे. या यादीवर नजर टाकली तर भारताच्या विजयाच्या टक्केवारीत सुधारणा झाली आहे. अव्वल स्थानी असणा-या न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी 75 असून भारतीय संघाची ही टक्केवारी 64.58 पर्यंत वाढली आहे. मालिकेतील शेवटची कसोटी जिंकून भारत डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहचू शकतो. दुसरीकडे रांची कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी 21.88 वरून 19.44 झाली आहे. (WTC Points Table Update)

रांची कसोटीत टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी केली. यष्टीरक्षक ध्रुव जुरेल व्यतिरिक्त सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा, शुभमन गिल, फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि कुलदीप यादव यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर भारताला हा विजय मिळवून दिला.

दुसऱ्या डावात भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य होते. जे संघाने रोहित शर्मा (55), शुबमन गिल (नाबाद 52), ध्रुव जुरेल (नाबाद 39), यशस्वी जैस्वाल (37) यांच्या खेळीच्या जोरावर साध्य केले. एकेकाळी भारतीय संघाने 120 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंडने सामन्यात जबरदस्त कमबॅक केले होते. मात्र आपला दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या ध्रुव जुरेलने शुभमन गिलसोबत 72 धावांची नाबाद भागीदारी केली आणि भारताला सामन्यसह मालिका विजय मिळवून दिला. (WTC Points Table Update)

Back to top button