पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या इतिहासात आज (१८ एप्रिल) एक विशेष कामगिरी करणार आहे. तो आयपीएलच्या एका एलिट क्लबमध्ये सामील होणार आहे, ज्यामध्ये आतापर्यंत फक्त महेंद्रसिंग धोनीचे नाव आहे. चेन्नई सुपर किंग्जचा महान यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने आयपीएलमध्ये 250 हून अधिक सामने खेळले आहेत. आता या यादीत रोहित शर्माच्या नावाचा समवेश होणार आहे.
रोहित शर्मा जेव्हा चंदीगडच्या मैदानावर पंजाब किंग्ज विरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा तो आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू बनेल. त्याच्यापेक्षा जास्त सामने खेळणारा एकमेव महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून साठी 256 सामने खेळले आहेत, तर रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत 249 सामने खेळले आहेत. त्यानंतर तिस-या क्रमांकावर दिनेश कार्तिक आहे. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आतापर्यंत 249 सामने खेळले आहेत.
रोहित शर्माच्याने 249 सामन्यांच्या 244 डावांमध्ये 29 वेळा नाबाद राहताना एकूण 6472 धावा केल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 109 धावा आहे. त्याने 30.1 च्या सरासरीने आणि 131.22 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. दोन शतकांव्यतिरिक्त त्याने 42 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने 582 चौकार आणि 272 षटकार ठोकले आहेत.